१ नोव्हेंबरपासून गोव्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसता कामा नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांना सूचना !

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांना असे सांगावे का लागते ?

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून गोव्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसता कामा नये, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना दिली आहे. शनिवार, २ ऑक्टोबर या दिवशी आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयाशेजारी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांशी चर्चा केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘मला ठाऊक आहे, यावर्षी मुसळधार पाऊस पडला आहे; परंतु १ नोव्हेंबरपासून गोव्यातील रस्त्यांवर खड्डे असणार नाहीत, याचे आम्ही दायित्व घ्यायला हवे, तसेच रस्त्यांची दुरुस्ती किंवा बांधकाम जलद गतीने आणि दर्जात्मक करायला हवे. मला ठाऊक आहे की, आमदार, सरपंच आणि पंच काही प्रकल्प पूर्ण करावेत, अशी मागणी करण्यासाठी तुमच्याकडे येतात; परंतु कसे नियोजन करायचे हे तुम्हालाच अधिक ठाऊक आहे. तुम्हाला एखादे काम खरेच आवश्यक आहे का ? हे पहावे लागेल. काही वेळा ‘पेव्हर ब्लॉक’ वापरून एखादी पायवाट बांधण्यासाठी आपण दीड ते दोन कोटी रुपये खर्च करतो. पंचायतीने सांगितले तरी कशाला प्राधान्य द्यायचे, हे तुम्हाला ठरवावे लागेल. अनेक ठिकाणी शासकीय इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये पालट करून त्या पुन्हा वापरात कशा येऊ शकतील ? हे पहायला हवे. आधीच्या शासनाने बांधलेल्या काही इमारती विनावापर पडून आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे पर्यटन खात्याने केरी येथे एक इमारत बांधली. तिचे उद्घाटन करण्यात आले; परंतु नंतर त्या इमारतीचा वापरच झाला नाही. आता त्या इमारतीच्या लाद्या किंवा दारेही शिल्लक नाहीत. (संबंधित उत्तरदायींकडून इमारतीसाठी झालेला खर्च वसूल करा ! – संपादक) आज मी पशूसंवर्धन खात्याची ‘गेस्ट हाऊस’ म्हणून वापरण्यात येणारी एक इमारत केंद्रशासनाच्या ‘इंडियन फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी’ला हस्तांतरित केली. तशी दृष्टी आपण ठेवली पाहिजे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वास्तू बांधकाम विभागाने स्वयंपूर्ण होऊन बाहेरून येणार्‍या सल्लागाराला देण्यात येणार्‍या निधीची बचत करावी. गोव्यातील हवामानानुसार कशा प्रकारची इमारत बांधायची हे सार्वजनिक बांधकाम खात्याला चांगले ठाऊक असल्याने खात्याने स्वतःच इमारत बांधावी, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने जलस्रोत खात्याच्या सहकार्याने राज्यात पाण्याचा तुटवडा होणार नाही याकडे पहावे.’’

१५ ऑक्टोबरला ‘हॉटमिक्स’ प्रकल्प चालू करण्याचे आश्वासन

पणजी- कोरोना महामारीमुळे दुरुस्तीकामे प्रलंबित राहिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता ‘हॉटमिक्स’ डांबरीकरणासाठी कंत्राटदाराला ‘वर्क ऑर्डर’ (काम चालू करण्यासाठी अधिकृत पत्र) देण्यात आलेली आहे. रस्ता दुरुस्तीची निम्मी कामे पूर्ण झालेली आहेत आणि उर्वरित काम कच्चा माल न मिळाल्याने प्रलंबित राहिली आहेत. १५ ऑक्टोबरला ‘हॉटमिक्स’ प्रकल्प चालू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.