बुलढाणा जिल्ह्यात पिकांची सर्वाधिक हानी
अमरावती – गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने शेतकर्यांच्या पिकांची पुष्कळ हानी झाली आहे. मराठवाड्यासमवेत पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या ५ जिल्ह्यांतील सोयाबीन अन् कपाशी या पिकांची पुष्कळ हानी झाली आहे. पश्चिम विदर्भातील तब्बल ३ लाख ६६ सहस्र ३०२ हेक्टर शेतातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली आहेत. हानी झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक हानी सोयाबीनच्या पिकांची झाली आहे. २ लाख ३८ सहस्र हेक्टर शेतातील सोयाबीन मातीमोल झाले आहे. १ लाख १ सहस्र ५५४ वरील कपाशी पिकाची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार पावणेचार लाख हेक्टर शेतीची हानी असली, तरी ‘यापेक्षाही अधिक हानी झाली आहे’, असे कृषी तज्ञांचे मत आहे. पिकांची सर्वाधिक हानी बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. पावसामुळे अकोला जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद या पिकांची हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मका आणि ज्वारी या पिकांची हानी, तर यवतमाळमध्ये भाजीपाल्याची हानी झाली आहे.