|
|
मुंबई – मुंबईत मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. मराठी शाळा आणि शाळांतील विद्यार्थी यांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट होत असून मागील १० वर्षांत १३० मराठी शाळा बंद पडल्या आहेत, तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संख्येतही ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या न्यून होत असली, तरी हिंदी आणि उर्दू माध्यमांतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांना माहितीच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीमधून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मागील १० वर्षांत मराठी शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत ६७ सहस्र ३३ इतकी घट झाली. मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. जागतिकीकरणामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढत आहे. गरीब विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा व्यय परवडत नसल्याचे सांगत महानगरपालिकेने मागील काही वर्षांत मुंबईमध्ये इंग्रजी आणि अन्य माध्यमांच्या शाळा चालू केल्या आहेत. केवळ २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षात ‘सी.बी.एस्.ई.’ आणि ‘आय.सी.एस्.ई.’ या अभ्यासक्रमांच्या एकूण १२ शाळा चालू करण्यात आल्या आहेत. मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळाही चालू करण्यात आल्या आहेत.
केवळ २८३ मराठी शाळा शिल्लक !
२०१० – २०११ या शैक्षणिक वर्षात मुंबईमध्ये ४१३ मराठी शाळा होत्या. त्यामध्ये १ लाख २ सहस्र २१४ विद्यार्थी शिकत होते. २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबईत केवळ २८३ मराठी शाळा शिल्लक असून त्यामध्ये केवळ ३५ सहस्र १८१ विद्यार्थी शिकत आहेत.
२०१९-२०२० या शैक्षणिक वर्षामध्ये उर्दू शाळांची संख्या १९३ होती. त्यांमध्ये ६२ सहस्र ५१६ विद्यार्थी शिकत होते, तर त्याच शैक्षणिक वर्षामध्ये २२७ हिंदी शाळा होत्या आणि त्यांमध्ये ६३ सहस्र २०२ विद्यार्थी शिकत होते.