पनवेल – गाढी नदीवरील देवद-सुकापूर या गावांना जोडणार्या पुलाच्या कामाचा कार्यादेश सिडकोने कंत्राटदाराला दिला आहे. नवीन पुलाचे बांधकाम झाल्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पुलाच्या उभारणीसाठी ११ कोटी ७६ लाख ६ सहस्र रुपये इतका व्यय येणार आहे. हा पूल सिद्ध करण्यासाठी १८ मास लागणार आहेत. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अध्यक्ष असतांना या पुलाची पहाणी करून गाढी नदीवरील देवद-सुकापूर गावाला जोडणारा पूल आणि विचुंबे ते नवीन पनवेल या दोन पुलांच्या कामांसाठी निधी संमत केला होता. या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची समस्या सुटणार असून विचुंबे येथे जाणार्या नागरिकांना होणारा प्रवासाचा त्रासही अल्प होईल. संमती मिळाल्यामुळे देवद आणि सुकापूर येथील ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुलासाठी प्रयत्नशील असणार्या सर्वांचे आभार मानले आहेत.