सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार ! – किरीट सोमय्या, भाजप 

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, २ ऑक्टोबर – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी १९ सप्टेंबरला कोल्हापूर येथे जाणार होतो; मात्र पोलिसांनी मला घरातच बंदिस्त केले. एखादा पोलीस निरीक्षक इतके धाडस कसा करू शकतो ? याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माहिती नव्हते का ? त्यामुळे हा सर्व प्रकार पोलीस अधिकार्‍यांनीच केला, हे स्पष्ट होते. त्या वेळी माझ्या घराच्या बाहेर असणारे पोलीस अधिकारी हे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलत होते. त्यावरून मला कोल्हापूरला जाऊ न देणे, त्यासाठी मला घरातच कोंडून ठेवण्याचे कारस्थान विश्वास नांगरे-पाटील यांनी आखले होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘विश्वास नांगरे-पाटील हे चांगले पोलीस अधिकारी आहेत, असे बोलले जाते; पण मी तसे मानत नाही. एखाद्या भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी स्वतःचे प्यादे बनू दिले आहे. त्या वेळी खोटे आदेश काढून मला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.’’