योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे निधन !

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर

मुंबई योगविद्येच्या क्षेत्रात मागील ६० वर्षांहून अधिक काळ अथक कार्यरत असणारे योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर (वय ९५ वर्षे) यांचे ३० सप्टेंबर या दिवशी पहाटे वाशी येथे निधन झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पुष्पचक्र अर्पण करून योगाचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

योगविद्येचा प्रचार आणि प्रसार यांसाठी त्यांनी वर्ष १९७४ मध्ये योग्य विद्या निकेतन संस्थेची स्थापना करून असंख्य विद्यार्थी घडवले. ते विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगविद्येचे प्रशिक्षण देत आहेत. ‘आनंददायी योग’ ही संकल्पना समोर ठेवून संपूर्ण आयुष्य योगविद्येसाठी वाहून घेतलेले योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने वर्ष २००४ मध्ये ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्काराने केला. नवी मुंबई महानगरपालिकेने वर्ष २००२ मध्ये ‘नवी मुंबई रत्न’ हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा कार्यगौरव केला. योगाचे महत्त्व जनमानसात प्रसारित व्हावे आणि योगविद्येविषयी रुची वाढावी; म्हणून ‘आरोग्यासाठी योग’, ‘प्राणायाम’, ‘स्वास्थ्यासाठी योग’ असे ग्रंथ त्यांनी लिहिले.

योगाचार्यांचे योगप्रसाराचे उदात्त कार्य चालू ठेवणे आणि वाढवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’, अशी भावना अनेक योगशिक्षकांनी व्यक्त केली. या वेळी ठाणे घंटाळी मित्र मंडळाचे पदाधिकारी, पतंजली योगपिठाचे अभय काबरा, पनवेल आरोग्य सेवा समितीचे पदाधिकारी, संस्थापक पु.. भारद्वाज यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, ठाणे जिल्ह्याचे तहसीलदार, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष, तर शेकडो जणांनी ‘ऑनलाईन’ अंत्यदर्शन घेतले.