कुडाळ येथे नागरिकांच्या बैठकीत परप्रांतीय व्यापार्‍यांना आळा घालण्याची मागणी

  • स्थानिक भाजीविक्रेत्याला परप्रांतीय भाजीविक्रेत्याने मारहाण केल्याचे प्रकरण

  • नगरपंचायत पुढील ८ दिवसांत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार !

कुडाळ – कुडाळ शहरांमध्ये परप्रांतीय भाजीविक्रेत्याने स्थानिक भाजीविक्रेत्याला मारहाण केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्र येत ३० सप्टेंबरला गवळदेव मंदिर येथे बैठक घेतली. या बैठकीत परप्रांतीय व्यापार्‍यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. ‘परप्रांतियांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून याला आळा घातला पाहिजे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. भाजीविक्रेत्यांना एकाच ठिकाणी भाजीविक्री करता यावी, यासाठी भाजीमंडई (मार्केट) उभारण्याची सूचना सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी केली.

कुडाळ शहरानजीकच्या गवळदेव मंदिराच्या जवळ भाजीविक्री करणार्‍या स्थानिक भाजीविक्रेत्याला परप्रांतीय भाजीविक्रेत्याने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, तहसीलदार अमोल पाठक आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे उपस्थित होते.

या बैठकीत चर्चा करण्यात आलेली सूत्रे !

१. परप्रांतीय भाजीविक्रेते आणि मासेविक्रेते यांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक व्यापार्‍यांना त्रास देण्याचा प्रयत्न परप्रांतीय भाजीविक्रेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे परप्रांतीय भाजीविक्रेत्यांना शहरात व्यवसाय करायला द्यायचा कि नाही ? याचा विचार करावा लागेल.

२. परप्रांतीय भाजीविक्रेते बळजोरी करून जागा बळकावत असून या परप्रांतियांना काही स्थानिक लोकप्रतिनिधी पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांचा उद्दामपणा वाढला आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.

३. व्यवसाय करण्यावरून वाद होणार असतील, तर रस्त्यालगत बसणार्‍या सर्व  विक्रेत्यांना शहरातील भाजीमंडईत स्थलांतरित करण्यात यावे.

येत्या ८ दिवसांत उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करणार ! – मुख्याधिकारी, नगरपंचायत 

या बैठकीमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी सांगितले की, मुळात कारवाई कुणावर करणार ? सगळे रस्ते सरकारचे आहेत; पण भाजीविक्रेते रस्त्याच्या बाजूला बसतात. शहरात रस्त्यालगत बसणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई केली, तर बाजारपेठेत गटारावर बसणारे भाजीविक्रेतेसुद्धा अनधिकृत ठरतात. त्यांच्यावर कारवाई करण्यास गेल्यावर नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांशी वाद होतात. या समस्येवर येत्या ८ दिवसांत उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर संबंधितांची संयुक्त बैठक बोलावून अंतिम निर्णय घेतला जाईल.

परप्रांतियांना रोखा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनील भोगटे यांनी सांगितले की, भाजी आणि मासे यांची विक्री करणार्‍या परप्रांतियांना आताच रोखले पाहिजे. त्यांची नोंदणीसुद्धा नगरपंचायतीसह पोलीस ठाण्यात झाली पाहिजे. शहरातील व्यापार्‍यांनी काही गुजराती आणि मारवाडी व्यापार्‍यांना जागा दिल्या आहेत. या जागा हे व्यापारी कधी गिळंकृत करतील, हे सांगतासुद्धा येणार नाही. त्यामुळे आताच सावध झाले पाहिजे अन्यथा भविष्यात मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल.

लोकप्रतिनिधीचा दूरभाष येतो आणि कारवाई करण्यापासून रोखले जाते ! – पोलिसांनी टोचले कान 

या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले की, कुडाळ शहराला आकार आहे; पण शिस्त नाही. एखाद्यावर कारवाई केली, तर लगेच एखाद्या लोकप्रतिनिधीचा दूरभाष येतो आणि कारवाई करण्यापासून रोखले जाते. (यावरून लोकप्रतिनिधींचा पोलिसांच्या सेवेतील हस्तक्षेप दिसून येत असून हे गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. यामुळेच सर्वत्र गुंडगिरी आणि बेशिस्त वाढली आहे ! – संपादक) वाहतुकीचे नियम आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते आम्ही करायला सिद्ध आहोत; पण बेशिस्तपणा असेल, तर काहीच होणार नाही.