श्रद्धा आणि बुद्धीप्रामाण्य !

जाणीव आणि नेणिव यांच्या पलीकडील अतींद्रिय ज्ञानाची पातळी !

‘नेणिवेच्या पातळीवरून ज्या प्रेरणा प्राणिमात्रामध्ये उद्भवतात त्या सहजप्रवृत्ती होत आणि जाणिवेच्या पातळीवरून येणार्‍या प्रेरणा म्हणजे तर्कबुद्धी; परंतु या दोन्ही प्रेरणांहून निराळी अशी जी सर्वोच्च प्रेरणा आहे, तिलाच ‘अतींद्रिय ज्ञानाची पातळी’, असे म्हणतात. ही पातळी केवळ ज्या पूर्ण मानवामध्ये परमात्मा स्पष्ट प्रतिबिंबित झालेला असतो, अशा अवतारी किंवा साक्षात्कारी संतांनाच गाठता येते. त्यामुळे आपण तर्कबुद्धने ईश्वराविषयी कितीही कल्पना केली, तरी ती साक्षात्कारी संतांच्या शब्दांपुढे तोकडी पडते; कारण ती इंद्रियगम्य किंवा बुद्धीविलासाने निर्माण केलेली केवळ कल्पनाच असते आणि याच्या उलट साक्षात्कारी संतांचा तो अतींद्रिय पातळीवरील अनुभव असतो. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ।’’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५२) म्हणजे ‘तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकण्यासारख्या इह-पर लोकांतील सर्व भोगांपासून विरक्त होशील.’ सत्यप्राप्तीसाठी (ईश्वरप्राप्तीसाठी) शास्त्रग्रंथांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे; कारण हे ग्रंथ प्रकृतीपर्यंतच शिकवू शकतात. ही प्रकृती ज्या त्रिगुणांची बनली आहे आणि ज्यांच्यापासून सारे विश्व विकसित होते त्या त्रिगुणांच्या पलिकडे हे ग्रंथ जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच अवतारी किंवा साक्षात्कारी संतांच्या वक्तव्याचे श्रद्धापूर्वक मनन करणे, हीच जनसामान्यासाठी खरी ज्ञानसाधना होय.

संतांनी केलेल्या चमत्कारांमागील कारण

वरील ज्ञानसाधनेसाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. शब्देविना ही ज्ञानसाधना होऊच शकत नाही; परंतु त्याचसमवेत दुसरा असा प्रश्र निर्माण होतो की, संतांच्या वचनांचे जर बुद्धीवादी माणसाला श्रद्धेच्या अभावी काहीच आकलन झाले नाही, तर तो उपदेश आचरणांत आणायला त्याला स्वारस्यच वाटणार नाही. साक्षात्कारी संतांना या परिस्थितीची योग्य कल्पना असते. संत हे व्यक्तीच्या आणि समाजाच्या ‘श्रेयसा’चे देशकालानुरूप योग्य स्वरूप ठरवतात अन् नंतर त्याला अनुरूप असे व्यक्तींचे आणि समाजाचे जीवन त्यांच्याकडून सहज अन् लीलया घडवले जाते. काही वेळा हितकारक गोष्टी समाजाच्या तर्कबुद्धीला पटत नाहीत आणि अशाच वेळी तर्कबुद्धीचा थिटेपणा प्रस्थापित करण्यासाठी संतांकडून अनेक चमत्कार केले जातात. केव्हा केव्हा लहान मुलाने काढा घ्यावा म्हणून त्याला गुळाचा खडा द्यावा लागतो, त्याप्रमाणे वस्तुतः ते चमत्कार नसून त्या संतांच्या लीला असतात आणि या लीलांमधूनच श्रद्धा जन्माला येते अन् विकसित पावते. व्यक्तीच्या जीवनात कित्येक वेळा असे काही प्रसंग येतात की, केवळ तर्कबुद्धीने त्यांची सोडवणूक होऊ शकत नाही; पण असे प्रश्न साक्षात्कारी संत त्यांना प्राप्त असलेल्या इंद्रियांतीत ज्ञानामुळे चुटकी सरशी सोडवू शकतात. यालाच लोक ‘संतांनी केलेले चमत्कार’, असे म्हणतात आणि त्यामुळे ‘Where reason ends, faith begins’, (जेथे कारणे संपतात, तेथे श्रद्धेला प्रारंभ होतो) अशी अवस्था निर्माण होते.

‘बुद्धीप्रामाण्य’ म्हणजे काय ?

तर्काने घेतलेले निर्णय, म्हणजे जे एकदम स्फुरलेले नाहीत किंवा अपौरुषेयही नाहीत, यालाच ‘बुद्धीप्रामाण्य’ म्हणतात. या बुद्धीप्रामाण्याची विरुद्ध बाजू म्हणजेच ‘श्रद्धा.’ याच ठिकाणी मानवी मनात संभ्रम निर्माण होतो की, त्याने कुणाचे मानावे ? स्वतःच्या तर्काला पटलेली गोष्ट मानावी कि संत सांगतात ते मानावे ? मग ते साक्षात्कारी संत का असेनात, असा जो संभ्रम निर्माण होतो, त्यालाच ‘तर्कवाद’ आणि ‘श्रद्धावादाचा संघर्ष’ असे म्हणतात. संतांच्या लीला या केवळ संघर्ष नाहीसा करण्यासाठीच असतात. वस्तुतः मानवी जीवनात ‘बुद्धी’ आणि ‘श्रद्धा’ यांच्यामध्ये कधी मूलभूत असा संघर्ष नसतोच. बुद्धीवादी लोक व्यवहारामध्ये ज्या गोष्टी विश्वासावर मानतात, त्यालाच पारमार्थिक भाषेमध्ये ‘श्रद्धा’ म्हणतात. श्रद्धेचा उपहास करणार्‍या काही बुद्धीवादी लोकांच्या ध्यानात ही गोष्ट येत नाही, हेच दुर्दैव !

स्वतःच्या बुद्धीची शक्ती ओळखणे हाच खरा बुद्धीवाद !

वस्तुतः बुद्धी आणि श्रद्धा यामध्ये मूलभूत संघर्ष नसून त्या दोहोंचे सहचर्यच मानवी जीवनात दिसून येते. ज्या ज्या वेळी बुद्धी चालेनाशी होते, त्या त्या वेळी श्रद्धेचा आरंभ होतो आणि अशा तर्‍हेने श्रद्धेचा स्वीकार बुद्धीला विचारूनच होतो. श्रद्धा आणि बुद्धी यांचा हा अतूट संबंध नीट लक्षात घेतला पाहिजे; कारण श्रद्धा आणि बुद्धीप्रामाण्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अन् ज्ञान ते नाणे आहे. ‘नील आर्मस्ट्राँग’ चंद्रयानातून चंद्रावर जाऊन परत आला, हे जेवढे सत्य आहे, तेवढेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले किंवा प्रभु रामचंद्र सीतामाईसह लंकेहून पुष्पक विमानाने अयोध्येला गेले, हेही सत्यच मानावे लागेल. एखादा निरक्षर माणूसही या तीनही गोष्टींवर सारखाच विश्वास ठेवतो, त्याने वरील पैकी एकही गोष्ट स्वतः पाहिलेली नसते किंवा अनुभवलेलीही नसते. पहिल्या गोष्टीविषयीचा त्यांचा विश्वास हा बुद्धीप्रामाण्यावर अधिष्ठित असून दुसर्‍या दोन गोष्टींचा विश्वास म्हणजे त्याची श्रद्धा. आकाशातून किंवा अवकाशातून उड्डाण करण्याविषयीच्या मानवी ज्ञानाच्या या दोन बाजू आहेत आणि त्याच्यामध्ये पुष्कळच जवळीक आहे. ‘ज्याविषयी आपणाला कळत नाही, त्याविषयी दुसर्‍या जाणत्या माणसाने सांगितलेले मानायला हवे’, ही गोष्ट बुद्धीवादाला मान्य आहे. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाले, तर तुम्हाला कळत नसते, तेव्हा तुम्ही दुसर्‍याचे मानता म्हणजे श्रद्धा ठेवता. ‘डॉक्टरांनी केलेले रोगनिदान योग्य असून दिलेले औषधही योग्य आहे’, अशी श्रद्धा रोगी ठेवतो, तेव्हा कुठला बुद्धीवाद तो उपयोगात आणतो ? मग जीवनात बुद्धीवाद आणि श्रद्धावाद यात मूलतः विरोध कुठे आहे ? आपण वाटेल त्या गोष्टींत बुद्धी चालवतो आणि बुद्धी चालेनाशी झाली की, जाणत्यावर श्रद्धा ठेवतो, ही गोष्ट मान्य करणे, हाच खरा बुद्धीप्रामाण्यवाद होय. मग बुद्धीवाद आणि श्रद्धा यांत विरोध राहिलाच कुठे ? स्वतःच्या बुद्धीची शक्ती ओळखणे हाच खरा बुद्धीवाद होय. नाहीतर आपण शाळेत शिकलेल्या गोष्टीतील बेडकासारखे व्हायचे. बेडूक पोट फुगवून फुगवून शेवटी मेला; पण तो बैलाएवढा मोठा काही होऊ शकला नाही. अशा तर्‍हेने आपल्या बुद्धीची शक्ती आणि मर्यादा आपल्याला कळली पाहिजे. ती समजणे हाच खरा बुद्धीप्रामाण्यवाद हे पटवून देण्याचे कार्य संत त्यांच्या लीलेने करत असतात.

संतांच्या सांगण्यावर शंका उपस्थित करणारे बुद्धीप्रामाण्यवादी व्यावहारिक गोष्टींत दुसर्‍यांच्या विश्वासावर चालतात !

एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना प्रारंभी वाटते की, मी सहज उत्तर देईन; पण नंतर लक्षात येते की, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही; म्हणून आपण म्हणतो, ‘मी विचार करून याचे उत्तर देईन.’ विचार करून करून दमल्यावर मग म्हणतो, ‘मी कुणातरी जाणत्या माणसाला विचारून सांगीन’, अशा तर्‍हेने एकाच प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मागच्या या ३ भूमिका आहेत आणि त्या तीनही भूमिका बुद्धीप्रामाण्यावरच आधारलेल्या आहेत अन् इथे ही बुद्धी आणि श्रद्धा यांचे सहचर्यच दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवहारात जे दिसते किंवा बुद्धीत जे उतरते तेवढेच खरे, असे मानावयाचे काहीच कारण नाही. पुष्कळ वेळा दुसर्‍याच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवूनच चालावे लागते आणि तसे करणे, हाही बुद्धीप्रामाण्यवादच होय; कारण पुष्कळशा गोष्टी अशा असतात की, त्या अस्तित्वात असूनही व्यवहारात दिसत नाहीत किंवा आपणाला अनुभवता ही येत नाहीत. उदाहरण द्यायचे म्हणजे वस्तुतः अग्नी हा अत्यंत दाहक आहे; पण सती जाणारी स्त्री स्वतःच्या पतीच्या वियोगाने इतकी तप्त झालेली असते की, तिला पतीविरहापुढे अग्नीच्या ज्वालाही शीतल वाटतात. फार काय आपला सामान्य व्यवहारही श्रद्धेवरच चालतो. आपण भले वाटेल तेवढे बुद्धीप्रामाण्यवादी असलो, तरीही आपल्याला दुसर्‍यावर विश्वास ठेवूनच चालावे लागते. उदाहरणार्थ आचार्‍याने स्वयंपाकात विष मिसळलेले नाही, अशी बालंबाल निश्चिती असल्यामुळेच आपण निर्धास्तपणे जेवण घेतो, म्हणजे आचार्‍यावर आपण विश्वास ठेवतो.

शेकडो लोक प्रतिदिन आगगाडीतून किंवा विमानांतूनही निर्धास्तपणे प्रवास करतात तो केवळ त्या सर्वांचा आगगाडीचा चालक किंवा वैमानिक यांच्यावर विश्वास असतो म्हणूनच. या विश्वासावर ते मजेत निर्धास्तपणे प्रवास कसा करू शकतात ? ही सुद्धा एक श्रद्धाच आहे. आपल्याच सारख्या एका व्यक्तीवर आपली श्रद्धा बसल्यामुळे आगगाडीतील किंवा विमानातील आपला प्रवास निर्धास्त आणि सुखकारक होतो. मग या भवसागरातून जीवनाचा प्रवास करतांना सर्व जगाचा नियंता जो विश्वव्यापी परमेश्वर आहे, त्याच्यावर अशीच पूर्ण श्रद्धा ठेवून आपण निर्धास्त राहिलो, तर आपली जीवनयात्रा किती आनंदमय होईल ?, या कल्पनेनेही शरीर रोमांचित होते. आचारी, चालक किंवा वैमानिक यांच्यापेक्षा संत आणि परमेश्वर नक्कीच श्रेष्ठ आणि समर्थ आहेत. मग साक्षात्कारी संतांवर श्रद्धा ठेवून निर्धास्त रहाण्यास कुणी सांगितले, तर त्यांत आपणास खटकण्याचे कारण काय ? चालकावर किंवा वैमानिकावर श्रद्धा ठेवून निर्धास्त रहाणे जर आपल्या बुद्धीप्रामाण्याला पटते, तर याज्ञवल्क्यावर किंवा शंकराचार्यावर श्रद्धा ठेवणार्‍यांना अंधश्रद्धाळू म्हणणे हा कुठला बुद्धीप्रामाण्यवाद ?

– एन्.जी. परुळेकर

(साभार : मासिक ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक, वर्ष १९७७)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/515638.html