विमा अधिकार्यांचे खरे रूप ! अधिकार्यांना असे सांगावे लागणे चिंताजनक ! – संपादक
संभाजीनगर – अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल २० लाख हेक्टर शेतीची हानी झाली आहे. त्यापैकी ९० टक्के पंचनामेही पूर्ण झाले आहेत. विमा आस्थापनांविषयी शेतकर्यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. या वेळी अतीवृष्टी झालेल्या भागांत हानीभरपाई न दिल्यास विमा आस्थापनांच्या अधिकार्यांना कारागृहात पाठवू, अशी चेतावणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. येथील विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील हानीची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,
१. सततच्या पावसामुळे हानी वाढत आहे. पंचनामे लांबले, तरी चालतील; पण ते पारदर्शक करावेत, असे आदेश दिले आहेत. एकाही हानीग्रस्त शेतकर्याचे नाव सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. बनावट नावे सूचीत येऊ नयेत. (असे का सांगावे लागते ? याचा अर्थ अशा प्रकारच्या चुका होत आहेत, हे गंभीर आहे ! – संपादक)
२. आस्थापनांविषयी शेतकर्यांकडून तक्रारी येत आहेत. या आस्थापनांकडे शेतकर्यांनी आधी पैसे भरलेले आहेत, त्यामुळे हे आस्थापन हानीभरपाई फुकट देणार नाहीत. शेतकर्यांची अडवणूक केल्यास विमा आस्थापनांना वठणीवर आणले जाईल. मस्ती करणार्या विमा आस्थापनांची गय करणार नाही.