कोल्हापूर-हुपरी खराब झालेल्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर (मध्यभागी मास्क घातलेले) यांना निवेदन देतांना राजू यादव (डावीकडे) आणि शिवसैनिक

कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर ते हुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून उंचगाव महामार्गापासून पुढे गडमुडशिंगी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची चाळण झालेली आहे. या रस्त्यावरील  खडड्यांमुळे तेथे अपघात होत आहेत. तरी कोल्हापूर-हुपरी खराब झालेल्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा, या मागणीचे निवेदन करवीरतालुकाप्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांना देण्यात आले. हा रस्ता डांबरीकरण न झाल्यास करवीर शिवसेनेच्या वतीने हुपरी-कोल्हापूर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राजू यादव यांनी दिली आहे. (जी गोष्ट करवीर शिवसेनेच्या लक्षात येते, ती सर्व यंत्रणा असलेल्या बांधकाम खात्याच्या का लक्षात येत नाही ? रस्त्यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठीही आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)

या वेळी अवधूत साळोखे, कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, सागर पाटील, संतोष चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, दिलीप सावंत, सचिन नागटिळक, बाळा सो नलवडे, अजित चव्हाण, बाबुराब पाटील, शिवाजी लोहार, योगेश लोहार यांसह अन्य उपस्थित होते.