सातारा, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे २ वर्षे रखडलेला राज्य लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा एस्.सी.बी.सी. आरक्षण वगळून अंतिम निकाल घोषित झाला. यामध्ये कराड तालुक्यातील बनवडी गावचे सुपुत्र प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रसाद यांच्या यशाविषयी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच परिषदेचे अध्यक्ष शंकरराव खापे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी प्रसाद यांचे अभिनंदन केले आहे.
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी मुंबईसह अन्य ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील ३ लाख ६० सहस्र ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील ६ सहस्र ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. १३-१५ जुलै २०१९ या कालावधीत मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथे या परीक्षा घेण्यात आल्या.