जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ ऑक्टोबरपासून चालू करण्यासाठी मानक कार्यप्रणाली अन् मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन करणे या अटींवर अनुमती देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितलेली अन्य सूत्रे
१. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्या वेळेविषयी संबंधित विश्वस्त मंडळ आणि अधिकारी यांनी निर्णय घ्यायचा आहे. मास्क परिधान करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, ‘थर्मल स्क्रिनिंग’ करणे आणि वारंवार हात धुणे किंवा निर्जंतुकीकरण करणे (सॅनिटायझेशन) बंधनकारक असणार आहे.
२. सर्व संबंधित प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून मानक कार्यप्रणाली आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे कि नाही, याची तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी अन् स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आले आहेत.
३. यापूर्वी कोरोना महामारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १२ ऑगस्ट २०२१ या दिवशी विहित केलेले आदेश आणि त्यात उल्लेख असलेली सर्व सूत्रे पुढील आदेश मिळेपर्यंत तशीच लागू रहातील.
४. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अन्य आजाराने ग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील लहान मुले यांना घरीच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
५. धार्मिक स्थळे किंवा प्रार्थना स्थळे यांचे व्यवस्थापन करणार्या संस्थांनी यांविषयी नागरिकांना सूचना द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
६. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे या ठिकाणचे सर्व कामगार, सेवेकरी आणि भाविक यांच्याकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे.
७. उपरोक्त आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदींप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.