शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा चालतात, मग साहित्य संमेलन का नाही ? – कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद  

मराठवाडा साहित्य संमेलन

संभाजीनगर – ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन घेतांना मनात अनेक प्रश्न होते. ‘स्वतःवर गुन्हे नोंद होतील’, अशी चर्चा आमच्यात झाली; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांना गर्दी होतेच ना. त्यांच्यावर कुठे गुन्हे नोंद होतात ? मग स्वतःवर कसे होतील ? त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्यास ते मागे घेतले जातील आणि त्यांच्यासमवेत स्वतःवरीलही गुन्हे मागे घेतले जातील. चांगल्या कामासाठी गुन्हे नोंद झाले, तरी चालेल. त्याने काहीही फरक पडणार नाही’, असे वक्तव्य मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी येथे केले. २५ सप्टेंबर या दिवशी ‘मराठवाडा साहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ठाले पाटील यांनी आपल्या शैलीत अशोकराव चव्हाण आणि सरकार यांना फटकारले.

कौतिकराव ठाले पाटील पुढे म्हणाले, ‘‘मराठवाडा ही मराठीची जन्मभूमी आहे. येथेच मराठीतील पहिला काव्यग्रंथ लिहिला गेला आहे; मात्र इतिहासतज्ञ राजवाडे यांनी खोडसाळपणा करून ‘मराठीतील पहिला ग्रंथ विदर्भात लिहिला’, असा शोध लावला; मात्र ते चुकीचे आहे. आद्यकवी मुकुंदराज हे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील आहेत, असे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. आपण इतिहास घडवतो; मात्र तो लिहित नाही. त्यामुळे असे खोटे संदर्भ चव्हाट्यावर येतात.’’

अशोक चव्हाण म्हणाले की, कौतिकराव ठाले पाटील यांनी केलेल्या मागण्यांचा विचार केला जाईल. येत्या ६ मासांत नांदेड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यालयाला जागा देऊ, तसेच अन्य प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन कृती आराखडा बनवू. त्याच्या कार्यवाहीसाठी प्रति ६ मासांनी बैठक घेत राहू.