‘न्यासा’ संस्थेच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागातील विविध पदांची परीक्षा रहित !
जालना – राज्य सरकारकडून आरोग्य विभागांतील विविध पदांच्या परीक्षा अचानक रहित करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवार संतप्त झाले आहेत. आरोग्य विभागाचे प्रमुख आणि मंत्री म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा आयत्या वेळी रहित कराव्या लागल्याच्या निर्णयावर दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच ‘न्यासा’ संस्थेच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा रहित करावी लागली. त्यामुळे ‘न्यासाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे’, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २५ सप्टेंबर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, न्यासा आस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील परीक्षा रहित कराव्या लागल्या आहेत. यामुळे अनेक परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या प्रकरणी उद्याच बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या परीक्षेचा नवीन दिनांक घोषित करणार आहे. न्यासा हे आस्थापन काळ्या सूचीतील नाही किंवा त्याला ‘काळ्या सूची’त टाकलेले नाही. २५ आणि २६ सप्टेंबर या दिवशी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रहित झालेली नाही, तर ती पुढे ढकलली आहे. आता ८-१० दिवसांतच परीक्षा घेणार आहोत.