२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
१. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ‘नारायण नागबळी’ आणि ‘कालसर्पशांती’ हे विधी ३ – ४ वेळा करूनही त्रास समूळ नष्ट न होणे अन् प.पू. घडशी महाराज यांनी ‘कालसर्पशांती’ हा विधी पुन्हा करायला सांगणे
‘पूर्वीपासूनच आम्हा सावंत कुटुंबियांना पूर्वजांचा त्रास पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ‘नारायण नागबळी’ आणि ‘कालसर्पशांती’ हे विधी ३ – ४ वेळा केले आहेत, तरीही हा त्रास समूळ नष्ट झाला नाही. अलीकडेच काही मासांपूर्वी माझा मुलगा श्री. यज्ञेश याची कुडाळ येथे प.पू. घडशी महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी आम्हाला ‘कालसर्पशांती’ हा विधी पुन्हा करायला सांगितला. १२.३.२०२१ या दिवशी त्यांनी घरातील आम्हा चारही जणांना त्यांच्या कुडाळ येथील आश्रमात विधीसाठी बोलावले.
२. प.पू. घडशी महाराज यांच्या आश्रमात विधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. ‘प.पू. घडशी महाराज यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत असून सावंत कुटुंबियांना होणारा आध्यात्मिक त्रास दूर करत आहेत’, असे जाणवणे : संतांच्या मार्गदर्शनानुसार ‘कालसर्पशांती’ हा विधी होत असल्याने विधीच्या ठिकाणचे वातावरण सात्त्विक होते. त्या वेळी ‘प.पू. घडशी महाराज यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टरच हा विधी करत असून सावंत कुटुंबियांना होणारा आध्यात्मिक त्रास दूर करत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. पुरोहित सांगत असलेले उपचार माझ्याकडून भावपूर्णरित्या होत होते. त्या वेळी ‘सर्पदोष दूर होत आहे’, असे मला जाणवत होते.
२ आ. चार वेळा डोक्यावरून स्नान करून ओलेत्याने विधी करूनही त्रास न होणे आणि ३-४ घंटे मांडी घालून खाली बसूनही गुडघेदुखी किंवा पाठदुखी यांचा त्रास न होणे :
१. विधी चालू असतांना ४ वेळा डोक्यावरून स्नान करून ओलेत्याने (स्नानानंतर डोके आणि शरीर न पुसता अंगावरील ओल्या वस्त्रासहित) विधी करावे लागले, तरीही मला थंड पाण्यामुळे त्रास झाला नाही किंवा थकवा जाणवला नाही. माझे शरीर चैतन्याने भारित झाले होते.
२. मला विधीसाठी ३-४ घंटे खाली मांडी घालून बसावे लागले, तरी मला गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा पाठदुखी यांचा त्रास झाला नाही. (एरव्ही मी भूमीवर थोडा वेळही मांडी घालून बसू शकत नाही. मला गुडघेदुखी आणि पाठदुखी यांचा तीव्र त्रास आहे.)
२ इ. विधीतील पिंड नदीत सोडण्यासाठी जातांना झालेले त्रास
२ इ १. दुपारच्या उन्हात खडबडीत आणि तापलेल्या मार्गावरून नदीवर जातांना पाय पुष्कळ पोळणे अन् धावता येत नसल्याने ‘प.पू. गुरुदेव, प.पू. गुरुदेव’ असा धावा करत मंद गतीने चालत नदीकाठी जाणे : विधीतील सर्व पिंड नदीत विसर्जन करायचे होते. विधी केलेल्या स्थानापासून नदी अर्धा किलोमीटर अंतरावर होती. ती दुपारची १.३०-२ वाजताची वेळ होती. मार्ग खडबडीत अन् तापलेला होता. त्या मार्गावरून चालतांना आगीतून जात असल्याप्रमाणे माझे पाय पोळत होते आणि टोकदार दगड तळपायांना टोचून तीव्र वेदना होत होत्या. हा विधी करण्यासाठी बाहेरील अन्य तिघे जणही आले होते आणि नदीवर जातांना ते तिघेही अक्षरशः पळत होते. मला मात्र चक्कर येण्याचा त्रास असल्याने माझा तोल जाण्याची आणि खाली पडण्याची शक्यता होती. त्यामुळे मला मुळीच धावता येत नव्हते. मी नामजप करत मंद गतीने चालत होतो. माझा ‘प.पू. गुरुदेव, प.पू. गुरुदेव’ असा धावा सतत चालू होता.
२ इ २. ‘चालतांना होणार्या असह्य वेदनांच्या माध्यमातून स्वतःचे आणि कुटुंबियांचे प्रारब्ध न्यून होत असून ‘गुरुदेव वेदना सहन करण्याची शक्ती देत आहेत’, असे जाणवणे : त्या वेळी चालतांना मला असह्य वेदना होत होत्या. ‘वेदनांच्या माध्यमातून माझे आणि कुटुंबियांचे प्रारब्ध न्यून होत असून ‘गुरुदेव ते सर्व भोगण्याची शक्ती देत आहेत’, असे मला जाणवले. मी नदीवर जाईपर्यंत अन्य तिघे जण पिंडांचे विसर्जन करून परत निघाले. ‘आश्रमात विधीच्या ठिकाणी आता मला एकटेच जावे लागणार’, असा विचार क्षणभर माझ्या मनात आला; परंतु देवाने माझी काळजी घेऊन मला सुरक्षितपणे विधीच्या ठिकाणी आणले.
२ ई. विधीनंतर शरिरावरील सर्व वस्त्रांचा त्याग करावा लागणे आणि प.पू. घडशी महाराज यांनी त्यांच्या जवळील वस्त्र परिधान करण्यास देणे : शास्त्रानुसार विधीनंतर मला शरिरावरच्या सर्व वस्त्रांचा त्याग करायचा होता. मला याविषयी काहीच कल्पना नव्हती. प.पू. घडशी महाराज यांनी मला मी नेसलेले धोतर आणि पांढरा सदरा काढायला सांगून त्यांच्याजवळील वस्त्र परिधान करण्यास दिले. तेव्हा माझी त्यांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त झाली.
२ उ. मागील १० वर्षांपासून पती-पत्नीमध्ये अकारण अढी निर्माण होऊन दोघे एकत्र असतांना वाईट शक्तींचे अस्तित्व जाणवणे; मात्र विधीनंतर एकत्र आल्यावर दैवी शक्तीचे अस्तित्व जाणवू लागणे : गेली १० वर्षे माझे पत्नीशी बोलणे होत नव्हते. आम्ही दोघे एकत्र राहू शकत नव्हतो. एरव्ही आम्ही एकत्र आलो की, मला त्रासदायक जाणवायचे किंवा वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवायचे. काही कारण नसतांना एकमेकांविषयी मनात अढी निर्माण व्हायची. विधी झाल्यानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला दैवी शक्तीचे अस्तित्व आणि चैतन्य जाणवू लागले. ‘आमच्यात सुसंवाद होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
विधी झाल्यानंतर एकाच दिवसात सर्व पालटून गेले. पत्नीचे मला अनेक कृतींमध्ये साहाय्य झाले. देवानेच मला या विधीचे इतके अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आणून दिले.
३. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अपार कृपेमुळेच हे सर्व होऊ शकले. त्याबद्दल प.पू. गुरुमाऊली आणि प.पू. घडशी महाराज यांच्या कोमल चरणी आम्ही सावंत कुटुंबीय कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.३.२०२१)