परमबीर सिंह यांच्या विरोधात दुसर्‍यांदा जामीनपात्र वॉरंट !

मुंबई – चांदीवाल चौकशी आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढले आहे. सिंह यांना ६ ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.

परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी आघाडी सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. चौकशीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे आयोगाने सिंह यांना जून मासात ५ सहस्र आणि ऑगस्ट मासात दोन वेळा २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर सिंह यांच्या विरोधात पहिला जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना ७ सप्टेंबर या दिवशी उपस्थित रहाण्याची नोटीस दिली होती. त्यानंतरही सिंह अनुपस्थित राहिल्याने आता दुसर्‍या वेळी वॉरंट काढण्यात आले आहे.