गोवा शासनाने ‘मोकाट जनावरे व्यवस्थापन योजना, २०१३’ कायद्यात केली सुधारणा !
डिचोली, २३ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने ‘मोकाट जनावरे व्यवस्थापन योजना, २०१३’ कायद्यात सुधारणा केली आहे आणि या अंतर्गत आता अशासकीय संस्थांच्या साहाय्याने रस्त्यावरील घायाळ गुरांना गोशाळेत वाहून नेण्यासाठी ५ सहस्र रुपये, तर मोकाट गुरांना वाहून नेण्यासाठी २ सहस्र रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘मोकाट जनावरे व्यवस्थापन योजना, २०१३’ कायद्यात आवश्यक सुधारणा केल्याबद्दल सिकेरी, डिचोली येथील ‘गोमंतक गोसेवक महासंघ’ या गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत तारी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पशूसंवर्धन खाते यांचे अभिनंदन केले आहे. कायद्यातील सुधारणा १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. कायद्यातील या पालटामुळे मोकाट गुरांचे पालनपोषण करण्यास साहाय्य होणार, अशी आशा गोप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
‘मोकाट जनावरे व्यवस्थापन योजना, २०१३’ कायद्यात सुधारणा करून रस्त्यावरील मोकाट गुरांना वाहून नेण्यासाठी निश्चित केलेल्या रकमेत वाहन खर्च, गुरांवर केले जाणारे औषधोपचार आणि कदाचित् गोवंशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पुढील आवश्यक सोपस्कारासाठीचा निधी यांची तरतूद आहे. कायद्यातील नवीन सुधारणांनुसार गुरांसाठी खाद्य (स्थानिक भाषेत खावड) देण्यासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या अनुषंगाने अध्यक्ष कमलाकांत तारी म्हणाले, ‘‘रस्त्यावर मोकाट फिरत असलेला गोवंश घायाळ अवस्थेत दिसला, तर आवश्यक साहाय्यासाठी नागरिकांनी ८३९०८९८५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा. रस्त्यावरील मोकाट घायाळ गोवंशाला जवळच्या गोशाळेत नेले जाणार आहे आणि जवळ गोशाळा नसेल, तर तिला सिकेरी येथील गोशाळेत नेले जाणार आहे.’’