वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

हवेच्या प्रदूषणामुळे प्रतिवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी पडतात !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ? – संपादक

नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेने वायू प्रदूषणाविषयी नवीन स्तर आणि नवीन गुणवत्ता पातळी घोषित केली आहे. याआधी या संघटनेने वर्ष २००५ मध्ये वायू प्रदूषणाविषयीचे विविध स्तर निश्‍चित केले होते. आता १६ वर्षांनंतर या संघटनेने हवेतील गुणवत्ता आणि प्रदूषण यांविषयी नवीन स्तर घोषित केले आहेत.

१. पूर्वी पी.एम्. २.५ (पार्टिक्युलेट मॅटर – कण पदार्थ) या प्रदूषकाचा हवेतील एका क्युबिक मीटरमागे (घन मीटरमागे) २५ मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुरक्षित समजला जायचा. आता पालटलेल्या स्तरानुसार १५ मायक्रोग्रॅम्स हा स्तरसुद्धा सुरक्षित नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे.

२. वायू प्रदूषणामध्ये जी ६ सर्वसाधारण प्रदूषके गृहीत धरली जातात, त्या सर्वांचा हवेतील गुणवत्ता स्तर हा पालटण्यात आला आहे. ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांच्या हवेतील गुणवत्ता स्तरामध्ये पालट करण्यात आले आहेत.

३. केवळ भारतच नाही, तर वर्ष २००५ च्या स्तरानुसार प्रदूषित म्हणून घोषित केलेल्या देशांतील थेट ९० टक्के लोकसंख्या ही नव्या स्तरानुसार ‘गंभीर’ अशा स्तरामध्ये मोडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. केवळ हवेच्या प्रदूषणामुळे विविध आजार होत प्रतिवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

४. देहलीसारखी शहरे वायू प्रदूषणाविषयी गंभीर पातळीवर आहेत. प्रदूषणाच्या नवीन स्तरानुसार पी.एम्. २.५ हे प्रदूषक हे देहलीसारख्या शहरात तब्बल १७ पटींनी अधिक आहे. नव्या स्तरानुसार मुंबईमध्ये वायूप्रदूषण ९ पटींनी अधिक, कोलकाता शहरात ८ पटींनी, तर चेन्नई शहरात ५ पटींनी अधिक ठरणार आहे.