पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना शासनाकडून देण्यात येणार्या २ लाख रुपये आर्थिक साहाय्य योजनेसाठी अर्ज करतांना अर्जासमवेत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही, अशी घोषणा शासनाने केली आहे.
यानुसार शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, या योजनेखाली आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी अर्ज करणार्यांना संबंधित रुग्णालयाकडून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या योजनेखाली आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी अर्जदाराकडे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा आग्रह न धरता अर्ज स्वीकारण्याचे ठरवले आहे. पर्याय म्हणून आरोग्य खाते आरोग्य सेवा संचालनालयाकडून मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण जाणून घेईल. अर्जदाराने अर्जाच्या नमुन्यामध्ये संबंधित रुग्णालयाने दिलेले कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आर्.टी.पी.सी.आर्. किंवा आर्.ए.टी. चाचण्यांचा आय.सी.एम्.आर्. प्रयोगशाळेचा अहवाल जोडणे आवश्यक आहे.