गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात घेतलेल्या कर्मचार्‍यांना अद्याप वेतन नाही

गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी हंगामी स्वरूपात भरती केलेल्या ४३० एम्.टी.एस्.(मल्टिटास्किंग) कर्मचार्‍यांपैकी बहुतेक जणांना गेल्या ५ मासांपासून वेतन मिळालेले नाही. याविषयी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ‘सुपरस्पेशालिटी’ विभागातील कर्मचार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘श्री गणेशचतुर्थीच्या आधी वेतन दिले जाईल’, अशी या कर्मचार्‍यांची अपेक्षा होती; परंतु ४० कर्मचारी वगळता इतर कर्मचार्‍यांना अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. या कर्मचार्‍यांना मासिक १७ सहस्र रुपये वेतन देण्यात येणार होते. हे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

या वृत्तानुसार सतीश नाईक हा कर्मचारी म्हणाला, ‘‘मी इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मला नोकरी नव्हती. त्यामुळे मी हे काम करण्याचे ठरवले. आम्हाला कामावर घेतांना कोरोनाबाधितांच्या प्रभागात (वॉर्डमध्ये) काम करावे लागेल, असे सांगितले होते. मी ते मान्य केले. इथे काम करतांना मी कित्येक मृतदेह उचलून बॅगांमध्ये भरले, रुग्णांना विविध प्रभागांमध्ये नेण्याचे काम केले. आमच्या कामावरच्या पाळीच्या वेळी आम्हाला २-३ तरी मृतदेह शवागारात न्यावे लागत असत. रात्रीच्या वेळी हे भीतीदायक होते; परंतु सध्या मला माझ्या प्रतिदिनच्या खर्चासाठी इतरांसमोर हात पसरावे लागत आहेत.’’

दुसरा एक कर्मचारी म्हणाला, ‘‘मला कामासाठी घरून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणून सोडणार्‍या वाहनचालकाचे पैसे अजून द्यायचे आहेत. जरी मला वेतन मिळाले नाही, तरी मी हे काम सोडणार नाही; कारण माझे पालक गरीब आहेत आणि मला दुसरी नोकरीही मिळणार नाही.’’

यासंबंधी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक दत्ताराम देसाई म्हणाले, ‘‘हंगामी स्वरूपात भरती करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनाची देयके आम्ही सिद्ध करून श्री गणेशचतुर्थीच्या आधी लेखा संचालनालयाकडे पाठवली आहेत. या कर्मचार्‍यांना अजून वेतन मिळालेले नाही, हे मलाही ठाऊक नव्हते.’’