गांधीनगर (कोल्हापूर) रेल्वे स्थानकावर येणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

स्टेशन प्रबंधक ए.आय. फर्नांडिस (मध्यभागी) यांना निवेदन देतांना राजू यादव (उजवीकडे) आणि अन्य शिवसैनिक

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २२ सप्टेंबर (वार्ता.) – गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कापड व्यापारपेठ असून मिरज, सांगली, हातकणंगले, रुकडी, जयसिंगपूर येथून गांधीनगर येथे कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या सहस्रोंमध्ये आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व रेल्वे गाड्यांचे गांधीनगर येथे थांबे रहित करण्यात आले आहेत. यामुळे प्रतिदिन येथे येणार्‍या कर्मचार्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्रवाशांनी ‘मासिक पास’ काढल्यास त्यांना प्रतिदिन ये-जा करणे आर्थिकदृष्टया सुलभ होते. तरी कष्टकरी, ग्राहक आणि इतर प्रवासी यांचा विचार करता गांधीनगर रेल्वे स्थानकावर येणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने स्टेशन प्रबंधक ए.आय. फर्नांडिस यांना देण्यात आले.

याविषयी वरिष्ठांना कळवण्यात येईल, असे आश्वासन स्टेशन प्रबंधक यांनी करवीर शिवसेनेला दिले. या वेळी गांधीनगरप्रमुख श्री. दिलीप सावंत, विभागप्रमुख श्री. दीपक पोपटाणी, सर्वश्री सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, अजित चव्हाण, विनोद रोहिडा, पवन गजवानी यांसह अन्य उपस्थित होते.