कराड, २२ सप्टेंबर (वार्ता.) – तालुक्यातील नांदलापूर येथील दगडखाणी ‘सील’ करूनही रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. याची माहिती मिळताच संबंधित खाणी ‘सील’ करून त्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याचसमवेत १२ क्रशरही सील करण्यात आले असून संबंधितांना नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी दिली.
प्रभारी तहसीलदार देवकर पुढे म्हणाले, ‘‘नांदलापूर येथील सरकारी जागेत ८ खाणी आहेत. यांची मुदत संपल्यामुळे मासापूर्वीच या खाणी बंद करण्यात आल्या होत्या; मात्र रात्रीच्या वेळी या खाणींतून उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार कारवाई करत सर्व खाणी ‘सील’ करण्यात आल्या असून क्रशरही ‘सील’ करण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तेथे चुना लावण्यात आला आहे. तसेच मोठी चर खोदून रस्तेही बंद करण्यात आले आहेत.’’