हिंदू अल्पसंख्य झाल्याने समस्या निर्माण झाल्या ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  

जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही ते सुरक्षित रहाण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्याला पर्याय नाही ! – संपादक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

उदयपूर (राजस्थान) – हिंदूंची लोकसंख्या ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे अल्प झाली, त्या त्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘हिंदु राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचे कल्याण होईल’, असा विश्वासही सरसंघचालक डॉ. भागवत यांनी व्यक्त केला. तसेच ‘कोरोना कालावधीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदुत्व आहे’, अशी हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी केली.

सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की,

१. हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसरणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. हिंदूंच्या विचारसरणीमध्ये शांती आणि सत्य या २ गोष्टींचा समावेश आहे. ‘आम्ही हिंदू हे खरेखुरे हिंदू नाही’, अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला दुर्बल बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे.

२. अनेक पिढ्यांपासून या पुण्यवान प्रदेशामध्ये रहाणार्‍या पूर्वजांचे आपण वंशज असून सर्वच जण हिंदू आहोत. हाच हिंदुत्वाचा भाव आहे.

(म्हणे) ‘जेथे मुसलमान अल्पसंख्य आहेत, तेथे मुसलमानांवर अत्याचार !’ – एम्.आय.एम्.

एम्.आय.एम्.चे असीम वकार

एम्.आय.एम्.चे असीम वकार यांनी सरसंघचालकांच्या विधानावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी मुसलमान अल्पसंख्य आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्कळ अत्याचार झाल्याचे पहायला मिळते, मग ते गुजरात असो किंवा महाराष्ट्र. आपल्या शेजारी असणारे कतार, दुबई असो किंवा ओमान असो, कुठेच हिंदूंवर मुसलमान अत्याचार करतांना दिसत नाहीत. (हिंदूंवर अत्याचार होणार्‍या पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या भारताच्या शेजारी राष्ट्रांची नावे घेण्यास साळसूदपणे टाळणारे वकार ! – संपादक) भारतात गुजरातसमवेत अनेक ठिकाणी मुसलमानांवरील अत्याचाराची सीमा ओलांडली गेली. (खोटारडे असीम वकार ! गुजरातमध्ये अशा किती घटना समोर आल्या आहेत, त्याची आकडेवारी वकार यांनी समोर आणावी ! – संपादक) त्यामुळे भागवत यांनी त्यांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. (वकार काश्मीरविषयी का बोलत नाहीत ? देशातील अनेक जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत, तेथील हिंदूंच्या स्थितीविषयी वकार का गप्प आहेत ? – संपादक)