ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडले !

किरीट सोमय्या यांच्या स्थानबद्धतेचे प्रकरण

लोकशाहीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणार्‍याला अटक केली जात आहे ! – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या

कराड (जिल्हा सातारा), २० सप्टेंबर (वार्ता.) – ‘सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना’ हा कोल्हापूर जिल्ह्यात असल्याने मी आज कागल पोलीस ठाण्यात जाऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार होतो. मी तक्रार प्रविष्ट करू नये म्हणून पोलिसांनी मला काल माझ्या घरीच मला अडवण्याचे प्रयत्न चालू केले होते. हसन मुश्रीफ यांच्यावर मी आरोप केले आहेत. त्याचे अन्वेषण चालू आहे. लोकशाहीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणार्‍याला अटक केली जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला.

सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘हसन मुश्रीफ यांच्यावर मी १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ‘आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात’ १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या कारखान्याची कागदपत्रे मी ‘ईडी’कडे (अंमलबजावणी संचालनालयाकडे) देणार आहे. वर्ष २०२० मध्ये कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ‘ब्रिक्स इंडिया’ला देण्यात आला. कोणताही अनुभव नसतांना हा कारखाना मुश्रीफ यांच्या जावयाला चालवण्यासाठी देण्यात आला. या संदर्भात लवकरच मी हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही बाहेर काढणार आहे.

किरीट सोमय्या हे २० सप्टेंबर या दिवशी कागल पोलीस ठाण्यात जाऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार होते; मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी सोमय्या यांच्यासाठी ‘कोल्हापूर जिल्हा बंदी’चे आदेश काढले. सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने १९ सप्टेंबरच्या रात्रीपासून कोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे एकूण परिस्थिती पहाता कोल्हापूर पोलीस आणि सातारा पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत सोमय्या यांना कराड येथे कह्यात घेऊन तेथील शासकीय विश्रामगृहावर नेले. त्याच ठिकाणी सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की,

हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता आले नाही. मला १९ सप्टेंबरला ६ घंटे घरात कोंडून ठेवण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही मला पोलिसांनी धक्काबुक्की केली. मला मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले. पोलिसांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या १९ सप्टेंबरला मुंबईतून निघून २० सप्टेंबरला मुंबईला पोचेपर्यंतच्या संदर्भात झालेल्या घडामोडी

१. २० सप्टेंबरला दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी किरीट सोमय्या यांनी सामाजिक माध्यमाद्वारे ट्वीट केले की, ‘ठाकरे सरकारची दडपशाही. माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी. माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी आणि हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री यांचे आदेश.’ यानंतर किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि त्यांना घरातच स्थानबद्ध करण्यात आले.

२. रात्री ८ वाजता किरीट सोमय्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उपस्थित झाले. या वेळी त्यांना ‘कोल्हापूर येथे जाऊ नका’, असे पोलीस सांगू लागले; मात्र पोलिसांना गराडा तोडून रेल्वे सुटण्यासाठी ५ मिनिटे शेष असतांना सोमय्या गाडीत चढले आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.

३. १९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी  ‘उद्या जर किरीट सोमय्या कोल्हापुरात आले, तर त्यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली.

४. सोमय्या यांना मुंबई ते सातारा या मार्गावरील कोणत्याही रेल्वे स्थानकावर पोलिसांनी अडवले नाही; मात्र कोल्हापूर पोलीस २० सप्टेंबरच्या पहाटेच सातारा रेल्वेस्थानकावर उपस्थित झाले आणि त्यांनी कलम १४४ ची नोटीस देऊन कराड येथील रेल्वे स्थानकावर उतरण्याची विनंती केली. यानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन पहाटे ४.४० वाजता किरीट सोमय्या हे कराड रेल्वे स्थानकावर उतरले. इथेही भाजपही कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केले.

५. २० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

काय आहे प्रकरण ?

१३ सप्टेंबर या दिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. खोट्या आस्थापनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे करून बेनामी संपत्ती जमा केली आहे. या संदर्भात माझ्याकडे २ सहस्र ७०० पृष्ठांचे पुरावे असून ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत’, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली होती. हे सर्व आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळले होते. त्या दिवसापासून या प्रकरणाविषयी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील संघर्ष चालू झाला. यानंतर दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी ते कोल्हापूर येथे जाणार असून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे घोषित केले आणि पूर्वनियोजनाप्रमाणे ते १९ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजता श्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर येथे निघणार होते. सोमय्या हे कोल्हापूर येथे जाणार असल्याचे निश्चित झाल्यावर पोलिसांनी त्यांनी मुंबईतच रोखण्याचा प्रयत्न केला आणि अखेर कराड येथे रेल्वेतून खाली उतरवले.