सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून (एम्.टी.डी.सी.कडून) शहरात करण्यात आलेल्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही; मात्र काही कामे अपूर्ण आहेत, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी सूचना संबंधितांना केली, अशी माहिती या कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांनी दिली. या समितीत जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, ‘एम्.टी.डी.सी.’चे कनिष्ठ अभियंता सतीश चुडे आणि साहाय्यक कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांचा समावेश आहे.
शहरात एम्.टी.डी.सी.कडून झालेल्या कामांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नगराध्यक्ष संजू परब आणि जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केला होता, तसेच याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १८ सप्टेंबरला शहरातील कामांची पहाणी केली. ‘संबंधितांनी कामे पूर्ण केली कि नाही, हे पुन्हा पाहिले जाईल’, असे समितीने सांगितले.