६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी हा एक आहे !

१४ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. नंदन ४ वर्षांचा होईपर्यंत जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पाहिली. या भागात तो ६ वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पहाणार आहोत. नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत. त्याला असे घडतांना पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि ‘ईश्वरी राज्य दूर नाही’, याची निश्चिती वाटते. ही पिढीच प.पू. गुरुदेवांचे ‘ईश्वरी राज्य चालवणार आहे’, हे लक्षात येते.

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510862.html

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. वय ५ ते ६ वर्षे

२ अ. सकारात्मक आणि आनंदी

‘नंदन नेहमीच सकारात्मक विचार करतो. त्यामुळे तो नेहमी वर्तमानकाळात रहातो आणि सदैव आनंदी असतो.

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

२ आ. स्वावलंबी

मला ‘नंदनने परीक्षेत चांगले गुण मिळवावे’, असे कधी वाटले नाही. तो शाळेत सर्व लक्ष देऊन ऐकतो आणि परीक्षा असतांना स्वतःहून अभ्यासाला बसतो. आम्ही आश्रमात रहात असल्यामुळे ‘स्वत:चे सर्व दायित्व घेऊन प्रत्येक गोष्ट करायला हवी’, हा संस्कार नंदनवर होत आहे. नंदनने स्वतःच अभ्यास करून इयत्ता पहिलीत A+ ही श्रेणी मिळवली. शाळेतील शिक्षकांनीही त्याचे कौतुक करत सांगितले, ‘‘नंदन पुष्कळ हुशार आहे. तो लगेच प्रतिसाद देतो आणि तो इतरांना साहाय्य करण्यास तप्तर असतो.’’

२ इ. नम्र

त्याला काही हवे असल्यास तो मला नम्रतेने विचारतो, ‘‘आई, मी तुला एक विचारू का ?’’ त्याच्यातील ही नम्रता आश्रमातील अन्य साधकांनाही जाणवते. तो इतरांकडून साहाय्य मागतांनाही नम्रतेने बोलतो.

२ ई. जिज्ञासू

त्याला नवीन विषय शिकण्याची जिज्ञासा आहे. त्याचे प्रश्नही अर्थपूर्ण असतात, उदा. ‘मासा पाण्यात श्वास कसा घेतो ? देवमासा (व्हेल) माशाचे शरीर इतके जड असते, तर तो उडी कशी मारू शकतो ?’

२ उ. प्रेमभाव

१. नंदनमध्ये बालपणापासूनच पुष्कळ प्रेमभाव आहे. भगवंताच्या कृपेने त्याच्यातील प्रेमभाव वाढत आहे. तो माझ्याहून पुष्कळ लहान आहे; परंतु अनेक वेळा त्याच्यातील प्रेमभावामुळे मला त्याचा आधार वाटतो आणि ‘मला त्याच्या सहवासात रहावे’, असे वाटते.

२. मी कधी निराश दिसले, तर तो लगेच मला विचारतो, ‘‘आई, तू ठीक आहेस ना ? तुझा आजचा दिवस कसा गेला ? तुला आनंद मिळाला ना ?’’ मी त्याला माझ्या मनातील विचार सांगितल्यावर तो मला म्हणतो, ‘‘आई, हे तू देवाला सांग. तोच आपल्याला साहाय्य करतो. मला काही येत नाही. मी केवळ तुझे ऐकू शकतो; पण देवच तुला साहाय्य करील. तू काळजी करू नकोस.’’ असे म्हणून तो मला मिठीत घेतो. तेव्हा माझी सकारात्मकता वाढते.

३. एक दिवस मी संपूर्ण दिवसभर चित्रीकरण सेवेत व्यस्त होते. तो मला भेटण्यासाठी चित्रीकरण कक्षात आला. तेव्हा अल्पाहाराची वेळ झाली होती; मात्र सर्व साधक सेवेत व्यस्त होते. हे पाहून त्याने खाली जाऊन सर्वांसाठी अल्पाहार आणि चहा आणला.

२ ऊ. लहान लहान सेवा करून साहाय्य करणे

अ. नंदन प्रतिदिन सकाळी ८ वाजता शाळेत जाऊन संध्याकाळी ५ वाजता परत येतो. तो खोलीचा केर काढणे, लादी पुसणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कचरापेटी रिकामी करणे, पाण्याच्या बाटल्या भरून आणणे, अशा अनेक सेवांत मला साहाय्य करतो.

आ. सुटीच्या दिवशी तो वेदपाठशाळेतील पूजेचे साहित्य स्वच्छ करणे, झाडांना पाणी घालणे, अशा सेवांसाठी साहाय्य करतो. त्याला कुणीही कुठलीही सेवा सांगितल्यास तो ती सेवा करण्यास आनंदाने जातो.

त्याला सेवेचा अखंड ध्यास आहे. ‘त्याचा सेवेचा ध्यास असाच वाढत राहू दे आणि तो गुरुदेवांना अपेक्षित असा उत्तम शिष्य बनू दे’, अशी श्री गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.

२ ए. चुकांविषयी खंत असणे

आश्रमातील साधक नंदनला साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने त्याच्या चुका सांगतात. मी त्याला विचारले, ‘‘चुका सांगणार्‍या साधकांविषयी तुला काय वाटते ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘जेव्हा ते प्रेमाने सांगतात, तेव्हा मला लगेच खंत वाटते; पण रागाने सांगितल्यास ‘त्यांनी मला असे का सांगितले ?’, असा विचार माझ्या मनात येतो आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडेच माझे लक्ष जाते. खरे तर माझे लक्ष त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे न जाता माझ्या चुकीकडेच जायला हवे.’’ त्याचे हे चिंतन ऐकून मला गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) फार कृतज्ञता वाटली. तेच या छोट्या मुलाच्या मनात असे विचार घालू शकतात.

२ ऐ. कर्तेपणा नसणे

एकदा एका साधिकेने त्याच्या बोलण्याच्या पद्धतीविषयी कौतुक केले. त्याविषयी मी नंदनला सांगितले, त्यावर तो लगेच उत्तरला, ‘‘आई, तूच मला ‘साधकांशी कसे बोलायचे ?’ हे शिकवले आहेस.’’ मी त्याला सांगितले, ‘‘सगळेच आई-वडील शिकवतात; पण तू ते शिकलास, ही प.पू. गुरुदेवांची कृपा आहे.’’

२ ओ. देवावर श्रद्धा

आम्हाला कधी कुठली अडचण आल्यास तो तप्तरतेने मला सांगतो, ‘‘भगवंत आहे ना ? तो सगळे सांभाळून घेईल. जे होते, ते आपल्या चांगल्यासाठीच !’’ यातून ‘त्याची देवावर दृढ श्रद्धा आहे’, हे लक्षात येते.

२ औ. नंदनमध्ये झालेले पालट !

२ औ १. पूर्वीच्या तुलनेत नंदन पुष्कळ शांत आणि स्थिर झाला आहे.

२ औ २. साधनेची तळमळ वाढणे : पूर्वीच्या तुलनेत नंदन आता साधनेचे प्रयत्न मनापासून करतो. तो आता प्रतिदिन स्वतःहून त्याच्याकडून झालेल्या चुका सारणीत लिहितो, नामजप करतो आणि श्लोक म्हणतो. त्याची सेवेची तळमळही वाढली आहे. नंदनला मध्यरात्री जाग आली, तरी तो उठून प.पू. गुरुदेवांचे स्मरण करतो. एकदा रात्री १२ वाजता उठून तो मला म्हणाला, ‘‘आई, अनुसंधान कसे ठेवायचे ? त्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’’ यावरून ‘त्याची अंतर्मनातून साधना चालू आहे’, हे माझ्या लक्षात आले.

२ औ ३. भाव वाढणे : पूर्वीच्या तुलनेत त्याच्या मनात प.पू. गुरुदेव, सद्गुरु, संत आणि साधक यांच्याप्रती असलेल्या भावात वाढ झाली आहे. त्याचे विचार आणि वागणूक ही सर्व भावाच्या स्तरावरच असते.

(क्रमशः सोमवारच्या अंकात)

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२.६.२०१९)