एकत्व, विशेषता आणि चैतन्य या लक्षणांपैकी चैतन्यामुळे राष्ट्रात स्वत्त्वजागरण होते, अस्मिता उत्पन्न होते, हे खरेच आहे. कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात, तर छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रात हे स्वत्त्व जागरण केले, आपापल्या वर्तुळात अवघ्या भारतवर्षाची भक्ती शिकवली, चैतन्य महाप्रभु, नरसी मेहता, तिरुवल्लुवर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा साधुपुरुषांनीही राष्ट्रातील चैतन्य आणि स्वत्त्व जागवले, हेही वास्तव आहे. स्वामी विवेकानंदांचे तर तुमच्या आमच्यावर याविषयी उदंड उपकार आहेत; पण या चैतन्याच्या आणि स्वतःच्या आविष्कारातून आसुरी आक्रमकता जन्माला येणार नाही, अशी विलक्षण दक्षताही येथे घेण्यात आली. म्हणून तर प्रभु श्रीरामचंद्र यांनी रावणवधानंतर ‘मरणान्तानि वैराणि ।’(वाल्मीकिरामायण, काण्ड ६, सर्ग १०९, श्लोक २६) म्हणजे ‘मरणासमवेत वैराचा अंत होतो’, हा उपदेश सर्वांना केला आणि शिवछत्रपतींनी मुसलमानांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व दिले नाही. सारांश, ‘चैतन्यातून उत्पन्न होणार्या ऊर्जेचा उपयोग स्वत्त्वजागरणासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी करायचा. अन्य राष्ट्रांवर किंवा समुहांवर आक्रमण करण्यासाठी करायचा नाही’, हा या भूमीतील संस्कृतीचा लोभसवाणा गुणविशेष आहे.’
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर – डिसेंबर २०११)