संभाजीनगर येथे घाटी परिसरातील धर्मशाळेत रुग्णांची सर्रास लूट !

खोलीसाठी आचारी मागतो अतिरिक्त ५०० रुपये, गादी, पलंग, चटईच्या नावाखालीही वसुली !

संभाजीनगर – मुंबई येथील श्री गाडगे महाराज मिशनच्या घाटी परिसरातील धर्मशाळेत गरीब रुग्णांची सर्रास लूट केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ही धर्मशाळा चालवली जाते; परंतु येथील आचारी एका खोलीसाठी अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी करतो, तसेच उपाहारगृहाचे व्यवस्थापक रुग्णांच्या पावत्या फाडत असून गादी, पलंग आणि चटई हे देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून खुलेआम वसुली केली जात आहे. (धर्मशाळेत गरिबांना अल्प दरात सुविधा न देता त्यांची लूट करणे हा लज्जास्पद प्रकार आहे. याकडे धर्मशाळा संस्थापकांचे लक्ष आहे की नाही ? रुग्णांची लूट करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात धर्मशाळा संस्थापकांनी कठोर कारवाई केली पाहिजे. – संपादक)

मुंबई येथील श्री गाडगे महाराज मिशनसमवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत धर्मशाळेचा करार केला आहे. कॅन्सर रुग्णालय आणि घाटी रुग्णालय येथे जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांतून पुष्कळ प्रमाणात रुग्ण येतात. काहींना अनेक मास उपचारासाठी थांबावे लागते. असे रुग्ण आणि नातेवाईक यांची सोय व्हावी म्हणून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर धर्मशाळेच्या वतीने गरीब रुग्णांसाठी स्वस्तात खोली आणि जेवण यांची सोय केली जाते; मात्र या चांगल्या योजनेला धर्मशाळेतील काही कर्मचार्‍यांनी हरताळ फासला आहे.

तात्काळ कारवाई करू !

‘सर्व शुल्क दर करारानुसार घेतले जातात. शिवाय काही विषयी आम्ही नाममात्र शुल्क घेतो; मात्र चुकीच्या पद्धतीने कुणी गरीब रुग्णांकडून पैसे घेत असेल, तर आम्ही त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करू’, असे धर्मशाळेचे संचालक समीर दिघे यांनी सांगितले.