तमिळ भाषा देवतांशी संबंधित असल्याने पूजा करतांना तिचाही वापर व्हावा ! – मद्रास उच्च न्यायालय

भाषा अस्मितेच्या दृष्टीकोनातून हिंदूंच्या भाषांपैकीच एक असलेल्या तमिळचा पुरस्कार योग्य आहे ! संस्कृत ही देवभाषा असून धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या दोन्ही स्तरांवर सर्वांत सात्त्विक अन् उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे धार्मिक विधी आदी करण्यामध्ये संस्कृतचा उपयोग करणे सर्वथा हितावह आहे, असेच हिंदूंना वाटते. – संपादक 

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळ जगातील प्राचीन भाषा आहे. तसेच ती ईश्वरीय भाषाही आहे. तमिळ भाषेचा जन्म भगवान शिवाच्या डमरूमधून झाला. पौराणिक कथेनुसार शिवाने पहिल्या अकादमीचे (प्रथम तमिळ संगमचे) अध्यक्षपद सांभाळले. तमिळ कवीच्या ज्ञानाच्या परीक्षणासाठी थिरुविलयादल हा खेळही शिवाने खेळला. म्हणजेच तमिळ भाषा देवतांशी संबंधित आहे. पूजा आणि पठण करतांना अशा ईश्वरीय भाषेचा वापर व्हायला हवा, असे मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.

न्यायालयाने पुढे म्हटले की,

१. वास्तविक विविध देश, धर्म, विविध प्रकारच्या परंपरा अस्तित्वात होत्या आणि पूजेची पद्धतही संस्कृती अन् धर्म यांनुसार पालटत राहिली; परंतु केवळ ‘संस्कृतच ईश्वराची भाषा आहे’, असे मानले गेले. ‘संस्कृतच्या तुलनेत कोणतीही भाषा नाही. संस्कृत प्राचीन भाषा आहे. त्यात अनेक प्राचीन साहित्यांची रचना झाली आहे’, याविषयी दुमत नाही; परंतु ईश्वर अनुयायांची प्रार्थना केवळ संस्कृतमधील वेदांचे पठण केल्यानंतरच ऐकतो, अशी धारणा बनली आहे.

२. सामान्य लोक बोलत असलेली प्रत्येक भाषा ईश्वरी भाषा आहे. माणूस भाषा बनवू शकत नाही. भाषा शतकानुशतके अस्तित्वात आहेत. भाषा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. विद्यमान भाषेत केवळ सुधारणा होऊ शकते. भाषेची निर्मिती होऊ शकत नाही.