सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सजावट करण्यात आली होती. १३ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता अचानक आग लागून संपूर्ण सजावट जळून गेली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले आणि पुढील अनर्थ टळला.
‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागलेली लक्षात येताच नागरिकांनी झाडाचा पाला, पाणी आदींचा उपयोग करून आग अटोक्यात आणली. आग विझली असून स्थापित श्री गणेशाच्या मूर्तीस कोणतीही इजा पोचलेली नाही, तसेच कुणालाही दुखापत झालेली नाही. नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची माहिती पंचायत समितीमधील कर्मचार्यांनी दिली आहे.