हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी मागील वर्षी केलेल्या विरोधाची नोंद घेऊन श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा चिपळूण नगर परिषदेचा निर्णय !

डावीकडून ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, श्री. सुरेश शिंदे, श्री. मनोज शिंदे आणि मुख्याधिकारी शिंगटे

चिपळूण (रत्नागिरी), १४ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांच्याकडून झालेल्या तीव्र विरोधाची नोंद घेऊन येथील नगर परिषदेने ‘विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याकरता मागील वर्षी वापरलेल्या कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्या वापरल्या’, ही स्वत:ची चूक सुधारत यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी कचरा वाहतुकीच्या गाड्या वापरल्यामुळे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् नागरिक यांनी मागील वर्षी विरोध दर्शवल्याचे सूत्र स्वतःहून मांडले. याविषयी नगरसेवकांनी ही गोष्ट चुकीची असून हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे आणि अशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याचा भाग रहित करण्याविषयी प्रशासनाला सांगितले. (धर्महानी होत असतांना ती रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या नगरसेवकांचे अभिनंदन ! – संपादक)

नगर परिषदेकडून श्री गणेशभक्तांवर कोणतीही बळजोरी केली जाणार नाही ! – प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण नगर परिषद

श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्यासाठी कचरा वाहतुकीच्या गाड्या वापरणे योग्य नाहीच. यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित करणार नाही. नगर परिषदेकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी  गणेशभक्तांवर कोणतीही बळजोरी केली जाणार नाही. तशी चूक कर्मचारीवर्गाकडून होत असेल, तर त्वरित आम्हाला कळवावे.

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधाची नोंद नगर परिषदेने घेतली आहे ! – शशिकांत मोदी, सभापती, सार्वजनिक आरोग्य समिती 

शासनाचा आदेश म्हणून नदीकिनारी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येईल. अतीवृष्टीमुळे नदीला पूर आल्यास श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गैरसोय होऊ नये, याकरता तो तलाव असेल. त्यात विसर्जनासाठी नागरिकांवर सक्ती केली जाणार नाही. भाविक नदीपात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू शकतात. कचरा वाहतुकीची वाहने वापरण्याच्या निर्णयाला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून झालेल्या विरोधाची नोंद नगर परिषदेने घेतली आहे.

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांच्या वतीने बांधकाम सभापती नगरसेवक मनोज शिंदे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, मनसे शहराध्यक्ष श्री. गणेश भोंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे  यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन याविषयी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.