कोकणात सर्वच ठिकाणी १५ सप्टेंबरपर्यंत अल्प-अधिक प्रमाणात पाऊस रहाणार !
मुंबई – मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड आणि रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ‘आय्.एम्.डी.’ने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडेल. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत प्रामुख्याने घाट विभागांत तुरळक ठिकाणी अतीवृष्टी होईल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अल्प दाबाचे क्षेत्र आणि मराठवाड्याच्या परिसरात असलेली वार्यांची चक्रीय स्थिती यांमुळे ७ सप्टेंबर या दिवशी मराठवाडा, विदर्भ आणि कोकण येथे विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. काही भागांत पुराचे पाणी शिरून शेतीची हानी झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथे सध्या पावसाचा जोर अल्प झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे अल्प-अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात सर्वच ठिकाणी १५ सप्टेंबरपर्यंत अल्प-अधिक प्रमाणात पाऊस रहाणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १३ ते १५ सप्टेंबर या काळात मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.