सूरत (गुजरात) – राज्यातील खेडा जिल्ह्यात असलेल्या आणि माही अन् गलती या नद्यांच्या संगमावर वसलेल्या प्राचीन गलतेश्वर महादेव मंदिराचा नुकताच जिर्णाेद्धार करण्यात आला. १२ व्या शतकातील या मंदिरावर ७५ फूट उंच शिखर बांधण्यात आले आहे. श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावास्येला या शिखरावर संत-महंतांच्या उपस्थितीत ५२ गज (१५० फूट) हिंदु ध्वज फडकवण्यात आला.
१. हे मंदिर सोळंकी युगातील असल्याचे समजते. भारतीय पुरातत्व विभागाने प्रसारित केलेल्या माहितीनुसार या मंदिराची शैली आणि मूर्तीकला प्राचीन सोमनाथ मंदिराशी मिळती जुळती आहे. या मंदिराच्या बांधकामामध्ये माळवा आणि चालुक्य शैलीचे अतिशय सुंदर पद्धतीचे मिश्रण आढळून येते.
२. मंदिराचे व्यवस्थापक रामदेस महाराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या जिर्णाेद्धारासाठी अनुमती दिली होती. हे ठिकाण डाकोर या मुख्य तीर्थक्षेत्राजवळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.