महापालिका आयुक्त आणि शहर अभियंता यांच्या नामफलकावर शाई फेकल्याचे प्रकरण
पिंपरी-चिंचवड (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांतर्गत रस्त्यांचे खोदकाम चालू आहे. उन्हाळ्यात रस्त्यांचे काम न करता ऐन गणेशोत्सवाच्या काळात रस्ते खोदण्याचे काम चालू केल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि शहर अभियंता अशोक भालकर यांच्या नामफलकावर, तसेच कार्यालयात शाई फेकली. या प्रकरणी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह ११ समर्थकांना १ दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर ११ सप्टेंबर या दिवशी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्वांना येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
पावसाळा आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांचे खोदकाम न करता गणेशोत्सवानंतर त्याचे नियोजन करावे, अशी मागणी कासारवाडी आणि फुगेवाडी येथील नागरिकांनी नगरसेविका आशा शेंडगे यांच्याकडे केली होती. याविषयी महापालिका आयुक्त यांनी सांगितले की, आयुक्तांच्या खुर्चीची प्रतिष्ठा आहे. मलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अन्य अधिकारी घाबरतील; म्हणून आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली.