अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे विश्वासाठी धोकादायक !

१. अफगाणिस्तानातील युद्ध जिंकण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे आणि प्रत्यक्षात तालिबानला अफगाणिस्तानवर सहजपणे नियंत्रण मिळवता येणे

‘अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दृष्टीने योग्य होता; कारण अमेरिकेत कुठलाही निर्णय हा त्यांच्या तज्ञांच्या मतानुसार घेतला जातो. शेवटच्या ४ राष्ट्राध्यक्षांनाही ‘अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून परत यावे’, असे वाटत होते. अमेरिकेने गेल्या २० वर्षांमध्ये त्यांचे २ सहस्र ५०० हून अधिक सैन्य गमावले आणि अब्जावधी डॉलर्स तेथे व्यय केले. तरीही ‘आपण युद्ध जिंकू’, अशी थोडीही शक्यता त्यांना वाटत नव्हती. अमेरिकाच नाही, तर कुठल्याही देशाला त्यांचे सैनिक अशा प्रकारे मारले जावेत, असे वाटत नाही. त्यामुळे अमेरिकेने तेथून परतण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून अफगाणिस्तानचे सरकार उभे केले होते. त्यांना साडेतीन लाख सैनिक सिद्ध करून दिले होते, त्यांना प्रशिक्षित करून अत्याधुनिक शस्त्रेही पुरवली. त्यामुळे अमेरिकी तज्ञांना ‘अफगाण सरकार आता तालिबानशी लढू शकेल’, असे वाटले होते. प्रत्यक्षात अमेरिकेने तेथून पाय काढून घेताच तालिबान्यांनी एकही गोळी न चालवता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले.

२. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यामुळे जगात आतंकवाद वाढण्याची शक्यता निर्माण होणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणे, हे जगासाठी धोकादायक आहे. त्यामुळे जे आतंकवादी गट जगातील विविध भागांत कार्यरत आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमध्ये आतंकवाद्यांची निर्मिती होईल, तसेच त्यांना लपण्यासाठी एक ठिकाण मिळेल. त्यामुळे तेथे एक सुरक्षित नंदनवनच निर्माण होईल. त्यामुळे हा निर्णय अमेरिकेच्या दृष्टीने जरी योग्य असला, तरी तो जगाच्या दृष्टीने अयोग्यच आहे. अफगाण नागरिकांना लोकशाहीप्रधान देशामध्ये रहाण्याची सवय झाली होती; परंतु तालिबानी त्यांना पाषाण युगात घेऊन जातील. हे त्यांना नको आहे.

३. आक्रमणाचा सूड म्हणून आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीत पोचणे

ज्या वेळी अमेरिकेतील जुळ्या मनोर्‍यांवर ९/११ चे आक्रमण झाले, तेव्हाच अमेरिकेने जगात असलेले आतंकवाद्यांचे कारखाने आणि स्थाने नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते अफगाणिस्तानमध्ये जाऊन पोचले होते. अमेरिकेला सैनिकांच्या साहाय्याने युद्ध करायची इच्छा नसते. ते विमाने किंवा ड्रोन यांचा वापर करून किंवा पैसे देऊन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने तालिबान्यांशी युद्ध जिंकणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये येण्याचा त्यांचा हेतू यशस्वी झाला नाही.

४. अफगाणिस्तानमध्ये सर्वच देशांचे हात पोळले असल्याने त्याला ‘महाशक्तींची स्मशानभूमी’ असे म्हटले जाणे

सध्या अमेरिकेला वाटते की, अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण आले आहे. त्यामुळे रशिया आणि चीन या देशांना तेथे नाक खुपसू द्यावे. त्यामुळे त्यांचेही हात पोळतील. अफगाणिस्तानमध्ये इंग्लंड, रशिया आणि आता अमेरिका या महाशक्तींचे हात पोळले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला ‘महाशक्तींची स्मशानभूमी’ असे म्हटले जाते. यापुढे अमेरिका अफगाणिस्तानमध्ये प्रत्यक्ष न जाता इतर देशांच्या माध्यमातून काही करता आले, तर करण्याचा प्रयत्न करील. अमेरिकेला त्यांची माणसे आणि अर्थव्यवस्था यांची काळजी अधिक आहे.

५. अनुभव नसल्याने तालिबानला अफगाणिस्तानमध्ये राज्यकारभार करणे कठीण होणार असणे आणि अशा परिस्थितीने तेथील नागरिकांच्या आयुष्यात अंधःकार पसरला असणे

अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांनी अमेरिकेच्या मुख्य भूमीवर आक्रमण केले, तर नक्कीच अमेरिका अफगाणिस्तानमध्ये किंवा इतर ठिकाणीही जाऊन त्यांना प्रत्युत्तर देईल; कारण त्यांच्या मुख्य भूमीवर झालेले आक्रमण त्यांना सहन होणार नाही. इतरत्र झालेल्या आक्रमणांविषयी अमेरिकेला सध्या फिकीर नाही. त्यामुळे येणार्‍या काळात अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय बिकट होईल. तालिबानला अफगाणिस्तानमध्ये राज्यकारभार करण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. त्यांना विविध जीवनावश्यक सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून द्याव्या लागतील; पण त्यासाठी राज्यकारभार करण्याचा अनुभव हवा. कारभार चालवण्यासाठी नोकर मिळाले, तरी त्यांना वेतन कुठून देणार ?

आज अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय वाईट आहे. पूर्वी त्यांची अर्थव्यवस्था चरस, अफू, गांजा यांवर आधारित होती; पण एका देशाला राज्यकारभार चालवण्यासाठी एका नियमित अर्थव्यवस्थेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना कारखाने चालवावे लागतील. विविध व्यापार, तसेच आयात-निर्यात हे सर्व त्यांना करता येईल का ? यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत का ? तेथे पैसे कोण गुंतवील, हे येणारा काळच सांगेल; पण चीन तेथे प्रचंड पैसा ओतून अमेरिकेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न निश्चित करील. अर्थात् त्या बदल्यात चीन तेथील अमूल्य खनिज संपत्ती हडप करील. सध्या अफगाणिस्तानमध्ये पाषाण युग आलेले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आयुष्यात अंधःकार पसरलेला आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.