पनवेल महापालिका क्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन वेळेची नोंदणी !

नवीन नियमानुसार विसर्जनस्थळी आरती करता येणार नाही !

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘कोर ओशन सोल्युशन्स’ यांच्या प्रणालीद्वारे ऑनलाईन वेळेची नोंदणी (टाइमस्लॉट बुकिंग) करण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. ही सुविधा pmc.visarjanslots.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत पालट करता येणार नाही किंवा तो रहित करता येणार नाही. प्रत्येक श्री गणेशमूर्तीच्या समवेत केवळ तीन लोक असावेत. विसर्जनस्थळी श्रींची आरती करता येणार नाही, असे नियम महापालिकेने लागू केले आहेत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एकूण ६० ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी त्यांच्या घराजवळचे मूर्ती विसर्जन स्थान आणि वेळ निश्चित करावी. ही सुविधा ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक विसर्जनाच्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत प्रत्येक विसर्जनस्थळी ३० मिनिटांच्या २० विसर्जन वेळा (स्लॉट) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.