‘सॅनिटायझर’ ज्वलनशील रसायन असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करा !

‘कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शक्य तेव्हा साबणाने हात धुवायला हवेत’, हे सर्वांना ठाऊक आहे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी वापरणे शक्य नसेल, तेव्हा ‘सॅनिटायझर’चा वापर करण्यास सांगितले जाते. ‘सॅनिटायझर’मध्ये ‘अल्कोहोल’ हे सहज ज्वलनशील असणार्‍या रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे ‘सॅनिटायझर’चा वापर करतांना त्वरित आग लागून हानी होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

सॅनिटायझर

१. कोणत्याही प्रकारच्या आगीच्या जवळ असतांना ‘सॅनिटायझर’ वापरू नये. उदा. उदबत्ती अथवा समई आदी जवळपास प्रज्वलित केलेली असेल, तर स्वयंपाकघरात चुलीच्या जवळ, जवळपास कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या आगीवर सॅनिटायझरचे थेंब गेल्याने त्वरित भडका उडू शकतो.

२. ‘सॅनिटायझर’ हातावर घेतल्यानंतर त्या द्रवपदार्थाचे वायूत रूपांतर होऊन हात कोरडे होतात, हे सर्वपरिचित आहे. येथे द्रवरूपात असलेले ‘अल्कोहोल’ हे रसायनही अशाच प्रकारे रूपांतरित होत असले, तरी त्याचा ज्वलनशीलता हा गुणधर्म तसाच रहातो. त्यामुळे  ‘सॅनिटायझर’ उपयोग करून झाल्यावर अल्पावधीतच हात कोरडे झाले आहेत’, असे वाटले, तरी अथवा आगीच्या स्थानापासून दूर असलो, तरी वायूरूपात परिवर्तित झालेले ‘अल्कोहोल’ पेट घेऊन हानी होऊ शकते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

३. एरव्हीही घरात ‘हात साबणाने धुणे’ हा प्रथम पर्याय असावा आणि ‘सॅनिटायझर’चा उपयोग अतीमर्यादित करावा.

४. लहान मुलांच्या हातात ‘सॅनिटायझर’ पडणार नाही असे करावे, तसेच त्यांच्यासाठी ‘सॅनिटायझर’ वापरायचा झाल्यास योग्य ती काळजी घ्यावी.

गणेशोत्सवाच्या काळात विशेष काळजी घ्या !

सध्याच्या गणेशोत्सवाच्या काळात (तसेच एरव्हीही) हाताला ‘सॅनिटायझर’ लावून निरांजनावर हात फिरवून आरती ग्रहण करू नये. उदबत्ती, समई किंवा स्वयंपाकघरात चूल आदी प्रज्वलित करण्याआधी हात धुवायचे असल्यास ते साबणाने धुवावेत.