जुलै मासातील अतीवृष्टीत वाहून गेला होता पूल !
कणकवली – जुलै मासात झालेल्या अतीवृष्टीत तालुक्यातील कनेडी-नाटळ मार्गावरील मल्हार नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यावर उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचा उभारण्यात आलेला लोखंडी पूल श्री गणेशचतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
हा पूल कोसळल्याने नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते, घोटगे आदी गावांचा संपर्क तुटला होता. कणकवली येथून या गावात जाण्यासाठी १५ कि.मी. अंतराचा फेरा पडत होता. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने या पुलासाठी ५२ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर २८ दिवसांत हा तात्पुरता पूल उभारण्यात आला. श्री गणेशचतुर्थीपूर्वी पूल वाहतुकीस खुला झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर आदी उपस्थित होते.