खासदार भावना गवळी अंमलबजावणी संचालनालयावर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत ! – हरीश सारडा, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

खासदार भावना गवळी आणि माजी उपजिल्हाप्रमुख हरीश सारडा (छायाचित्र सौजन्य : ETV भारत)

नागपूर – वाशिम येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या अंमलबजावणी संचालनालयावर (‘ईडी’) माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. जर माझी हत्या झाली, तर त्याला त्या उत्तरदायी असतील. गवळी यांनी ‘बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना’ अवसायनात काढून १०० कोटी रुपयांचा कारखाना अवघ्या २५ लाख रुपयांत स्वीय साहाय्यकाच्या नावाने खरेदी केला आहे, असे आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख हरीश सारडा यांनी ८ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केले. या संदर्भात सारडा यांनी भावना गवळी यांच्या विरोधात ‘ईडी’कडे तक्रार केली आहे.

हरीश सारडा पुढे म्हणाले की,

१. ‘ईडी’कडे तक्रार केल्यानंतर कारखान्याशी संबंधित ९ लोकांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली आहे. खासदार भावना गवळी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ‘त्यांच्या नावाने ३ संस्था आहेत’, अशी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली; पण प्रत्यक्षात त्यांचा संबंध ७ आस्थापनांशी आहे. त्यांच्या ११ वेगवेगळ्या संस्था आहेत. यामुळे शरद पवार यांनी ‘भावना गवळी यांना ‘ईडी’कडून विनाकारण त्रास देण्याचे काम चालू आहे’, असे वक्तव्य केले आहे; पण प्रत्यक्षात भावना गवळी यांनी शरद पवार यांना मतदारांची चुकीची माहिती दिली; म्हणून क्षमा मागितली पाहिजे.

२. याच कारखान्याच्या संबंधात राजकीय हेतूने वर्ष २०११ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट  करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात चौकशी लावण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक यांनी नागपूर खंडपिठात अहवाल सादर केला आहे. यामुळे नव्याने नेमलेली चौकशी समिती रहित करावी, असे पत्र खासदार भावना गवळी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना लिहिले होते. त्यानंतर ही चौकशी समिती रहित करण्यात आली आहे; मात्र असा निर्णय घेतला जात असतांना योग्य चौकशी न करता कुठल्या पुराव्याच्या आधारे ही चौकशी समिती रहित केली ? असा जाब बाळासाहेब पाटील यांना उच्च न्यायालयात विचारणार आहे.