पुणे येथील शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रकांत पाटलांची अमित शहांना विनंती !

पुणे येथील शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन प्रशासन स्वतःहून का करत नाही ? – संपादक

शनिवारवाडा

पुणे, १० सप्टेंबर – पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शनिवारवाडा हे निवासस्थान होते. नगारखाना, ३०० वर्षांपूर्वीचा दरवाजा, मराठी चित्रशैली आदी शनिवारवाड्याची ओळख आता पुसट होऊ लागली आहे. त्यामुळे शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने साहाय्य करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे ८ सप्टेंबर या दिवशी केली. पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव तसेच विश्वस्त यांनी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह पाटील यांची भेट घेऊन शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती केली होती.

पाटील यांनी गृहमंत्री शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या वाड्याचे महत्त्व अल्प करण्यासाठी इंग्रजांनी वर्ष १८१८ नंतर येथे भाजी मंडई केली, तसेच मनोरुग्ण कैद्यांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला. वर्ष १८२८ मध्ये या वाड्याला आग लावण्यात आली. ती ७ दिवस धुमसत होती. त्यात शनिवारवाड्याचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची आवश्यकता आहे.