नगरसेवक आणि प्रशासन यांना धारेवर धरत नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार !
नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली आणि प्रश्न सुटले तरच ‘वॉर्ड’ सभा यशस्वी झाली असे म्हणता येईल. – संपादक
पुणे – शहरातील विकास नागरिकांच्या करातून केला जातो; मात्र हा विकास नागरिकांच्या हितासाठी आणि योग्य व्यय करून केला जातो का ?, हे लक्षात यावे यासाठी आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवणे यांसाठी ‘सहकारनगर नागरिक मंच’ची स्थापना केली. या मंचच्या वतीने प्रभाग ३५ मधील नागरिकांच्या प्रश्नासाठी एका ‘वॉर्ड’ सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रशासन आणि नगरसेवक यांच्या कामाचा आढावा घेत प्रशासन अन् नगरसेवक यांना धारेवर धरत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
वाढती अतिक्रमणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नालेसफाई, भटकी कुत्री, अनधिकृत फ्लेक्स, कचरा, पदपथावरील अतिक्रमणे, अनधिकृत जागेवर उभी असलेली पोलीस ठाणी, ‘राष्ट्रीय हॉकर्स पॉलिसी’ची कार्यवाही यांविषयी प्रश्न उपस्थित केले. गॅस पाईपलाईन आणि समान पाणीपुरवठा योजना यांसाठी खोदकाम केल्यानंतर रस्ते पूर्ववत् केले जात नाहीत, अशी तक्रारही नागरिकांनी केली. प्रशासनाने केलेल्या कामाचे लेखापरीक्षण केले जाते का ? रस्ते आणि सोसायटी येथे लावलेल्या नावाच्या पाट्या कोणाच्या व्ययातून केल्या जातात ? असे अनेक प्रश्न नागरिकांनी या वेळी उपस्थित केले. महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक महेश वाबळे, आबा बागुल, परिमंडळ उपायुक्त जयंत भोसेकर यांसह इतर नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, ‘सहकारनगर नागरिक मंच’चे सदस्य उपस्थित होते.