गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना पथकर माफ ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणार्‍यांना मुंबई, गोवा, पुणे या महामार्गांवरील पथकर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी स्थानिक पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी प्रवासासाठीच्या वाहनाचा क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाचा दिनांक नमूद केल्यास तात्काळ ‘पथकर माफी स्टिकर’ देण्यात येणार आहे. गणेशात्सवाच्या दोन दिवस आधीपासून या पथकर माफीला प्रारंभ होईल आणि गणेशमूर्ती विसर्जनानंतर दोन दिवसांपर्यंत ही पथकर माफी असेल.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कोरोनावरील लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्यांना आर्टीपीसीआर् चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्हा प्रवेश करतांना किमान ७२ घंट्यांपूर्वीचे अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. अहवाल नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी संबंधित व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे.