मेढा (जिल्हा सातारा) येथे ६ चंदनचोरांना अटक

२ लाख ५१ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील बामणोली भागातील आपटी गावच्या सीमेमध्ये चंदनाच्या झाडांची अवैध तोडणी करण्यासाठी एक टोळी आली होती; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मेढा पोलिसांनी ६ चंदनचोरांना अटक केली आहे. पाटण तालुक्यातील मरळी येथील साखर कारखाना परिसरात रहाणारी ६ जणांची टोळी ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी आपटी गावच्या सीमेत म्हारकी नावाच्या शिवारात चंदनाच्या झाडांची तोडणी करत होती. याविषयी माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिंद्रा मॅक्स पिकअप, २ फूट लांब आणि ११ इंच जाड चंदनाचे लाकूड, कुर्‍हाड, करवत पाते असा २ लाख ५१ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.