जर्मनीमध्ये एका अफगाणी नागरिकाने २ जर्मन नागरिकांना भोसकले !

धर्मांध मग ते कुठल्याही देशातील असो, ते अन्य धर्मियांसाठी धोकादायकच असतात, हे यातून लक्षात येते ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

बर्लिन (जर्मनी) – येथे एका अफगाणी नागरिकाने माळीकाम करणार्‍या एका ५८ वर्षांच्या जर्मन महिलेवर आणि तिच्या साहाय्यासाठी आलेल्या दुसर्‍या व्यक्तीवर सुर्‍याने आक्रमण करून त्यांना घायाळ केले.

जर्मनीतील ‘एक्सप्रेस’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार सदर अफगाण नागरिक २८ वर्षांचा असून ‘महिलांनी माळीकाम करू नये’, अशी त्याची इस्लामधार्जिणी मानसिकता होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यक्तीला मानसिक आजार असल्याचा पोलिसांचा कयास आहे. हा अफगाणी नागरिक वर्ष २०१६ पासून जर्मनीमध्ये रहात आहे. सध्या अफगाणिस्तान सोडून जाणार्‍या अफगाणी नागरिकांना आश्रय देणे, हे इतर राष्ट्रांसाठी धोकादायक असल्याविषयीची चिंता व्यक्त केली जात आहे.

इराक आणि सीरिया या देशांमध्ये वर्ष २०१५-१६ या काळात इस्लामिक स्टेटच्या अत्याचारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी येथील लक्षावधी मुसलमान नागरिक युरोपीय देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी कूच करत होते. त्यावेळी जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल यांनी शरणार्थींना आश्रय देण्याचे धोरण अंगिकारले होते. एवढेच नव्हे, तर प्रत्येक युरोपीय देशाने शरणार्थींना स्वीकारण्यासाठी त्यांनी अन्य युरोपीय देशांवर दबाव बनवला होता. ‘युरो न्यूज’ या वृत्त संकेतस्थळानुसार आता उद्भवलेल्या अफगाणिस्तानच्या शरणार्थी संकटावर मात्र मर्केल यांनी ‘आपण सर्वांना स्वीकारून सर्वच समस्या सोडवू शकत नाही’, असे मागील मासात स्पष्ट केले आहे.