पुणे – भूमीच्या मालकीवरून निर्माण झालेले वाद मिटवतांना उपविभागीय अधिकार्यांनी चुकीचे निकाल दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी उपविभागीय अधिकार्यांनी दिलेले ३६ निकाल रद्दबातल केल्याने त्यांनी दिलेले निकाल वादाच्या भोवर्यात सापडले आहेत.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी भूमीविषयीच्या प्रकरणात सुनावणी न घेता आणि प्रतिवादींना नोटीस (सूचना) न देता ते अनुपस्थित राहिल्याचे दाखवले. बारावकर यांनी २ सहस्र ५१२ प्रकरणांमध्ये निकाल दिला होता. त्यातील ४६५ प्रकरणे त्यांनी नोटीस (सूचना) न देता कामकाजातून काढून टाकल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी रद्दबातल केलेले ३६ पैकी २२ निकाल बारावकर यांनी दिलेले आहेत. उपविभागीय अधिकार्यांनी चुकीचे निर्णय दिलेल्या खटल्यांमध्ये तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे दाखवून फेरफार नोंद न करणे, शेतकरी असल्याचा पुरावा असतांनाही तो पुरावा नाकारणे, गौण खनिजांचे उत्खनन केल्याप्रकरणी आकारलेला दंड रद्द न करणे, सातबारा किंवा अन्य फेरफार नोंद करणे यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे.