पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात कठोर निर्बंध लादणे आवश्यक आहे. या काळात सर्व तर्हेच्या मिरवणुकांवर बंदी घालावी, अशी सूचना कोरोना महामारीसंबंधी राज्यशासनाच्या तज्ञ समितीने शासनाला केली आहे.
तज्ञ समितीने केलेल्या महत्त्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
१. श्री गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशपूजन करण्यासाठी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून पुजारी येत असतात. परराज्यांतून गोव्यात येणार्या पुजार्यांसाठी ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणी प्रमाणपत्र (कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र) समवेत आणणे बंधनकारक करावे.
२. श्रींची आरती ‘ऑनलाईन’ स्वरूपात करावी.
३. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला कुटुंबातील दोनच सदस्यांना अनुमती द्यावी. श्रींचे विसर्जनाचे स्थळ घराच्या जवळ असावे.
४. केरळमधून गोव्यात येणार्यांसाठी ५ दिवस घरी अलगीकरणात रहाणे बंधनकारक करावे.
५. विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध घालावे.
६. गणेशोत्सवात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
७. श्री गणेशमूर्ती विक्री होत असलेल्या चित्रशाळेत १८ वर्षांखालील मुलांना प्रवेशबंदी करावी.
तज्ञ समितीच्या मते राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण २ टक्क्यांच्या आसपास आहे आणि राज्यात मागील २ आठवड्यांमध्ये २० ‘हॉटस्पॉट’ (कोरोनाचा संसर्ग अधिक असलेली ठिकाणे) नोंद झाले आहेत. पर्यटनाला प्रोत्साहन देणार्या आणि गर्दी होऊ शकेल, अशा कोणत्याही कृतीला प्रोत्साहन देऊ नये. गोव्यात ‘जिनोमी सिक्वेसिंग’शी (कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकारांशी) निगडित चाचणी करणारी ‘व्हायरोलॉजी’ प्रयोगशाळा तातडीने उभारावी. यामुळे चाचणीचे अहवाल लगेच मिळून कोरोनाच्या नवनवीन प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य होईल.