पुणे येथे ‘पर्यावरणपूरक (कि अशास्त्रीय ?) अंकुर गणेशा कार्यशाळा !’
- पर्यावरणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तीत बीजारोपण करणे धर्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य आहे; कारण शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा केलेली गणेशमूर्ती ही वहात्या पाण्यात विसर्जित करायची असते. झाडे लावण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस मोकळे आहेत. त्यासाठी श्री गणेशमूर्तीचा वापर करणे म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळण्यासारखे आहे ! – संपादक
- पर्यावरणप्रेमींचे प्रेम केवळ हिंदूंच्या उत्सवांवरच का ? बकरी ईदला पर्यावरणविषयक सल्ला देण्यास जाण्याचा विचार पियुष शाह करू शकतात का ? ‘पर्यावरणप्रेमी हिंदूंची दिशाभूल करून धर्माचरणापासून त्यांना कसे अलगद परावृत्त करतात’, याचे हे उत्तम उदाहरण आहे ! – संपादक
( हे छायाचित्र कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून केवळ जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध केले आहे, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक)
पुणे, ६ सप्टेंबर – जय गणेश व्यासपिठामधील अनुमाने ५१ गणेशोत्सव मंडळांनी प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने शमी किंवा जास्वंद यांच्या बियांचे रोपण करून श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्या आहेत. या ‘पर्यावरणपूरक (कि अशास्त्रीय ?) अंकुर गणेशा कार्यशाळे’चे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. शाळेत करण्यात आले होते. या उपक्रमाची संकल्पना पियूष शाह यांची होती.
शाह म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेल्या मूर्तीत गणेशाला आवडणारे शमी किंवा जास्वंद यांच्या बियांचे रोपण करण्यात आले आहे. (अशी अशास्त्रीय गणेशमूर्ती सिद्ध करण्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार आचरण करणे श्री गणेशाला अधिक आवडले असते. – संपादक) हीच मूर्ती पूजेची मूर्ती म्हणून कार्यकर्ते त्यांच्या मांडवात बसवणार आहेत आणि विसर्जन करून त्यातील ‘बी’मधून अंकुर फुटल्यानंतर त्याचे झाड कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लावणार आहोत.