कुडाळ शहरातील ‘कोविड केअर सेंटर’ बंद न करण्याची कुडाळ तालुका व्यापारी संघाची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

कुडाळ – शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात चालू असलेले ‘कोविड केअर सेंटर’ बंद करू नये, अशी मागणी कुडाळ तालुका व्यापारी संघाने एका निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल पाटील यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ येथील महिला आणि बाल रुग्णालयाचे ‘कोविड केअर सेंटर’मध्ये रूपांतर करण्यात आले; मात्र आता हे केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या केंद्रात सध्या कोरोनाचे २४ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाची तपासणी आणि उपचार यांसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. जिल्हा रुग्णालय या रुग्णालयापासून खूप दूर आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हे रुग्णालय बंद करू नये. अजूनही कोरोना महामारी संपलेली नाही. त्यातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच श्री गणेशचतुर्थीचा सणही जवळ आला असून या सणाला मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. त्यांच्या आरोग्याचा विचार करता हे केंद्र बंद करू नये.