पुणे, ५ सप्टेंबर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले. महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कर्वेनगर-वारजे प्रभागातील ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी वरील भाष्य केले.
शरद पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी)चा वापर होत आहे. तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, तसेच दक्षिणेतील राज्ये येथेही होत आहे.