‘इन्फोसिस’सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश आस्थापनावरील हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. केंद्रशासनाने या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक आहे ! – संपादक
नवी देहली – ‘इन्फोसिस’ आस्थापन देशविरोधी शक्तींशी संबंधित असून नक्षलवादी, साम्यवादी आणि राष्ट्रद्रोही यांच्या टोळीला साहाय्य करते, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने त्याच्या ताज्या अंकामध्ये केला आहे. ‘इन्फोसिस आस्थापनाच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी शक्ती भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत का ?’ असा प्रश्न या मासिकातून उपस्थित करण्यात आला आहे.
या नियतकालिकात म्हटले आहे की, इन्फोसिसने बनवलेले आयकर भरण्याचे संकेतस्थळ ७ जून २०२१ या दिवशी ऑनलाईन झाले; परंतु तेव्हापासून करदात्यांना या संकेतस्थळावर अडचणी येत आहेत. तसेच इन्फोसिसने बनवलेल्या कर भरण्याच्या प्रणालीतील त्रुटींमुळे लोकांचा कर प्रणालीवरील विश्वास अल्प होत आहे. अशा वेळी विचार करण्याची गोष्ट आहे की, यामध्ये राष्ट्रविरोधी शक्तींचे काहीच देणे घेणे नाही का ? हे देशाची अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्यासाठी तर केले जात नाही ना ? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. आरोप करतांना कोणतेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाहीत.